बुलडाणा : जिजामाता साखर कारखान्याकडे रखडलेली देणी देण्याच्या मागणीसाठी कामगारांनी सोमवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा उपनिबंधकासह जिल्हाधिकाऱ्यांंना दिले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत कामगारांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिला.
दुसरबीड येथील जिजामाता साखर कारखाना बंद पडल्यानंतर जवळपास ४५० ते ५०० कामगारांची देणी रखडली आहे. साखर कारखान्याची विक्री होऊनही कामगारांना त्यांचे पैसे मिळालेले नाही. याविषयी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देऊनही त्यांना केवळ आश्वासनच मिळत आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी रोजी १०० ते १५० कामगारांनी जिल्हा उपनिबंधकांच्या कार्यालयात दुपारी दीड वाजता धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन दिले तसेच देणी लवकर न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला. निवेदनावर जिजामाता साखर कामगार संघटनेचे अध्यक्ष राजन चौधरी, उपाध्यक्ष उत्तम जाधव, विनायक देशमुख यांचेसह इतरांच्या स्वाक्षरी आहेत.