लोकमत न्यूज नेटवर्कदेऊळगावराजा: बायपास रस्त्यावरील काही शेती मालकांच्या नोकरांनी शेतात साचणाऱ्या पावसाच्या पाण्यासाठी जेसीबीने नाली करण्यास कामगारांना सांगितले; मात्र कामगारांनी नकार दिल्याने वाद होऊन धारदार शस्त्राने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत व्यवस्थापकासह इतर कामगार गंभीर जखमी झाले असून, बायपास प्राधिकरणाच्या कार्यालयाचीदेखील तोडफोड करण्यात आली.बायपासलगत शेत असलेले संजय त्र्यंबक मानवतकर यांनी शेतातील पाणी वाहून जाण्याकरिता जेसीबीने शेतात नाली करून द्या, असे कामगारास सांगितले; परंतु कामगारांनी खासगी काम करता येत नाही, असे सांगितले. याचा राग आल्याने संजयने त्याच्या नातेवाइकास फोन करून गैरकायद्याची मंडळी जमवून शाहनिशा न करता व्यवस्थापक प्रवीण वाणी यांना संजय त्र्यंबक मानवतकर, संभाजी नन्नावरे, विठ्ठल साहेबराव शेरे, पांडुरंग भीमराव आटोळे, विनायक रामकिसन अनपट, अनिल मधुकर पवार, शिवाजी विठोबा मापारी सर्व राहणार देऊळगावराजा यांनी अश्लील शिवीगाळ करून लाठ्या काठ्या, चाकू, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत कामगार सचिन पवार, व्यवस्थापक प्रवीण वाणी, आरेंद्र सोनुने व कंत्राटदाराचे भाऊ दीपक आडके जखमी झाले, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
बायपासचे काम करणा-या कामगारांना मारहाण!
By admin | Published: June 27, 2017 9:22 AM