दुसरबीड येथील जिजामाता सहकारी साखर कारखानास्थळी असलेला साखर साठा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जाहीर लिलावाव्दारे विक्री करुन, प्राप्त रकमेतुन कारखान्याचे कामगारांची देणी अदा करण्याबाबत न्यायालयाने आदेश दिलेले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कारखानास्थळी असलेली साखर विक्री केलेली असुन साखर विक्रीपोटी जमा झालेली रक्कम महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडे आजरोजी जमा आहे. सद्यस्थितीत ही रक्कम बँकेकडुन अवसायक यांच्या बँक खात्यात हस्तांतरीत करण्यात आलेली नाही, तथापी कामगार देणी अनुषंगाने जिजामाता सहकारी साखर कारखाना कामगारांनी या कार्यालयास घेराव घालुन कामदेणी अदा करण्याबाबत दबाव तंत्राचा अवलंब केलेला आहे. १५ फेब्रुवारीपासुन या कार्यालयामध्ये धनादेश देण्यात यावे, या मागणीसाठी सर्व कामगारांनी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर ठिय्या दिलेला आहे. दरम्यान, १६ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेचे डॉ.महेंद्र चव्हाण यांना कामगारांनी धक्का-बुक्की व मारहाण करुन कपडे फाडलेले असुन जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घटनेमुळे सहकार विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये कामकाज करतांना भितीचे वातावरण तयार झालेले आहे. पोलीस सरंक्षण असताना शासनाचे वर्ग-१ पदावर कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यास अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटना घडत असल्याने इतर वर्गातील अधिकारी, कर्मचारी यांचेमध्ये तीव्र असंतोष पसरलेला आहे. त्यामुळे अशा असामाजिक घटकांवर पोलीस विभागाकडुन कडक कारवाई करण्याची मागणी राज्य सहकार खाते गट क कर्मचारी संघटनेच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावुन कामकाज करून प्रशासनाचे लक्ष वेधले.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचारी आक्रमक
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत घटनेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. या निवेदनावर राज्य संघटक राजेंद्र घोंगे, डी. एम. चौधरी, एस. के. घाटे, डी. बी. बोंडे, एस. एन. हिवाळे, एन. एस. साेनुने, सतिश गवई, प्रकाश गवई, रामेश्वर गवई, आदींच्या सह्या आहेत.