बुलडाणा : सैलानी यात्रेला ६ मार्चपासून सुरुवात होत असताना प्रशासनाने कोरोना व्हायरसचा धोका पाहता यात्रेला स्थगिती दिली आहे. सध्या १५ ते २० हजार भाविक सैलानीत दाखल झाले आहेत. भाविकांना परत पाठविण्यासाठी प्रशासनाने १० पथके सैलानीत पाठविली आहेत. सैलानी यात्रा महाराष्ट्रासह तेलंगणा, आंधप्रदेश, केरळ, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थानमध्येही प्रसिद्ध आहे. या सर्व भागातून जवळपास ८ लाखावर भाविक दरवर्षी यात्रेत येतात. देशात कोरोनाचे २८ संशयित रुग्ण पाहता कोरोनाचे संक्रमण टाळण्याच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. सैलानी यात्रेतील कोरोना व्हायरसचा धोका पाहता जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे. शुक्रवारी सकाळी उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे यांनी १० पथकांची बैठक घेतली. ही पथके सैलानीत जाऊन भाविकांना परत पाठविण्यासाठी काम करणार आहे. तसेच मंडळ अधिकारी, पंचायत समितीचे पदाधिकारीसुद्धा मदत करणार आहेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले रायपूर पोलिस स्टेशनमध्ये बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना देणार आहेत.
सैलानी यात्रेतील भाविकांना परत पाठविण्याची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 5:43 PM