हिवरा आश्रम : विवेकानंद आश्रम ही आरोग्यसेवेतून जनसेवा करणारी व त्या माध्यमातून कोट्यवधी रुग्णांच्या जीवनात आरोग्य बहाल करणारी महाराष्ट्रातील अग्रगण्य संस्था आहे. येथे ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिनानिमित्त आरोग्य क्षेत्रातील धन्वंतरी म्हणून गणल्या गेलेल्या शुकदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी वृद्धाश्रमात मोफत औषधींचे वितरण करण्यात आले.
आश्रमाने आजपर्यंत भौरद, सस्ती, खामगाव, अकोला, पातूर, मुंबई, नागपूर व हिवरा आश्रम इत्यादी ठिकाणी आरोग्य सेवा केंद्र चालविलीत. अनेक आरोग्य शिबिरे, ॲम्ब्युलन्सव्दारा वाडी-वस्त्यांवर आरोग्य सुविधा दिली. त्यात अनेक तज्ज्ञ डाॅक्टरांचे सहकार्य मिळाले. गतवर्षी संस्थेने जिल्हा प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन १०० खाटांच्या कोविड रुग्णालयाची व्यवस्था केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डाॅ. सुमन चंद्रा यांनी भेट देऊन सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती. परिसराची स्वच्छता, मोफत सॅनिटायझर्स, मास्क, घरपोच दूध, भाज्या, फळे, अन्नधान्य वितरण केल्याची माहिती यावेळी संस्थेचे सचिव यांनी दिली. शुकदास महाराजांनी आरोग्य सेवेत प्रचंड मोठे कार्य केले आहे. मानवसेवा हीच ईश्वर सेवा आहे, हा त्यांचा धर्मविचार सर्वसामान्य मानसाच्या जीवनात परिवर्तन करून गेला. आश्रमाने बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील ५ ते १२ वयोगटातील सुमारे ४० लाख विद्यार्थ्यांना अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत व्हिटॅमिन ए व जंतनाशक डी वर्मिंग टॅबलेट्सचे मोफत वितरण केले. जागतिक आरोग्य दिनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कोरोना काळात काम करणारे सर्व डाॅक्टर्स, नर्सेस, मेडिकल स्टाफ, सार्वजनिक आरोग्य विभागातील सर्वांचे काम ही ईश्वरी सेवाच असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते उपस्थित होते.