लोणार : तालुक्यात आंब्याचा मोहर चांगला बहरला आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तालुक्यात काही परिसरात आंब्याची मोठमोठी झाडे दिमाखात उभी आहेत. परिसरातील आंब्याच्या झाडांना आम्रमोहोर फुटल्याने यंदा गावरान आंब्याचा गोडवा चाखायला मिळणार आहे.
तालुक्यात मोजक्याच शेतकऱ्यांकडे आंब्याची झाडे आहेत. गावरान आंबा, तर दुर्मिळ झाला आहे. अनेकांनी पूर्वीची वनराई तोडून टाकली आहे. ही झाडे आकाराने मोठी असल्याने झाडांच्या सावलीत पीक येत नसल्याचे कारण पुढे करीत ही झाडे दिसेनासी झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी नवीन जातीच्या आंब्याची झाडे लावली आहेत. ही झाडे आकाराने लहान व उंचीलादेखील कमी असतात. बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन आंब्याच्या जातीसह पुन्हा गावरान आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. मात्र काही सजक शेतकरी गावरान आंब्याची आमराई जिवापाड जोपासत त्यातून गावरान आंब्याचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात गावरान आंब्याची मागणी होत असल्याने हमकास उत्पन्न होते. गावरान आंब्याच्या निर्यातीलाही मोठ्या प्रमाणावर चालना दिली जात आहे. या महत्त्वाच्या बाबीमुळे पुन्हा गावरान आंब्याच्या लागवड क्षेत्रात वाढ होत असल्याचे चित्र आहे. यावर्षी गावरान आंब्याच्या झाडांना मोहर चांगला आला आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याच्या गोडवा व रसाळीची चव चाखण्यास मिळेल, असे वाटत आहे. सध्याचा मोहराचा दरवळणारा सुगंध सुखावणारा ठरत आहे.
बॉक्स...
निसर्गाची साथ हवी
गेल्या तीन-चार वर्षांत ऐन आंब्याच्या मोहर आलेला असताना वादळी वारे व गारपिटी झाल्याने आंब्याचा मोहर गळून पडण्याचे प्रकार वाढलेले आहे. दरम्यान, हवामानामध्ये सतत बदल होत असल्याने आंब्याचा मोहर गळून काळपट झाल्याचे चित्र पहावयास मिळाले होते. या समस्यांमुळे आंब्याच्या उत्पादनात गेल्या काही वर्षांत घट झालेली दिसून येत आहे. बिकट परिस्थितीत महत्त्वाचा आधार म्हणून आंबा पिकाकडे पहिले जाते. पंरतु मोहर गळून पडल्याने आंबा उत्पादकांच्या अडचणीत वाढ झाल्याची परिस्थिती आहे.
बॉक्स..
आर्थिक आधार
तालुक्यातील विविध भागांमध्ये कमी अधिक प्रमाणात आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळते. शिवाय बरेच शेतकरी आंब्याची ठोक विक्री न करता किरकोळ विक्री करतात. यात आंब्याला चांगला दर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संमिश्र हवामानाचा परिणाम आंब्यावर झाल्याचे दिसून येत आहे.