राज्यात ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा वृद्धिदर कमी आहे, अशा जिल्ह्यांत निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत.
त्यानुसार, संसर्गाचा वृद्धिदर कमी असलेल्या जिल्ह्यात बुलडाण्याचा समावेश असल्याने जिल्ह्यात ‘अनलॉक’ करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच व्यवसायांना मुभा देण्यात आली आहे. वेळेचे बंधनही कमी करण्यात आले आहे. असे असले, तरी अद्याप भक्तांचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे बंद आहेत. ९ ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. या महिन्यात जिल्ह्यातील प्रत्येक शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते, परंतु देवस्थान बंद असल्याने गेटजवळ नतमस्तक होऊन परत जात आहे.
९ पासून श्रावण
यावर्षी ९ ऑगस्टपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात शहरातील मंदिरांमध्ये पूजाअर्चा होते. मेहकर तालुक्यातील शिवचंद्र मोळी येथील मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. यामुळे मंदिर परिसरातील व्यावसायिकांची आर्थिक उलाढालही वाढत असते, तसेच खेड्यापाड्यातूनही काही व्यावसायिक बेल, फुले व पूजा साहित्याची विक्री करण्यासाठी येतात.
भाविकांना मंदिर सुरू होण्याची प्रतीक्षा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे बंद आहेत. यासोबत लग्नसोहळे, कार्यक्रमही कमी प्रमाणात सुरू आहेत. आता निर्बंध शिथिल झाले असून, त्यामुळे थोड्या प्रमाणात व्यवसाय होत आहेत, परंतु मंदिरे बंद असल्याने अपेक्षित व्यवसाय होत नाही. मंदिरे उघडल्यास भाविकांना दिलासा मिळेल.
- संदीप नागरिक, अध्यक्ष, महादेव मंदिर संस्थान, शिवचंद्र मोळी.
शिवचंद्र मोळी येथे श्रावण महिन्यात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. संपूर्ण महिनाभर येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात, तसेच मंदिरात भाविक आल्यावर व्यवसायास चालना मिळते. दुकानात सर्व पूजा साहित्य असल्याने मंदिर उघडे राहणे आवश्यक आहे.
- मुरलीधर नागरिक, सचिव, शिवचंद्र मोळी.