शहरापासून चार किमी अंतरावर असलेल्या येळगाव धरणावरून शहराला पाणीपुरवठा केल्या जातो. बुलडाणा शहराला दर दिवसाला १ कोटी लीटर पाण्याची आवश्यकता असते. मात्र, येळगाव धरणात यंदा जलसाठाच न झाल्याने सध्या शहरातील नागरिकांना पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जातो. यामुळे शहरात अघोषित जलकपात केली जात असल्याचे चित्र आहे. तर पुढील काही महिन्यात प्रकल्पात जलसाठा जमा न झाल्यास शहराला टंचाईची समस्या बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
--प्रकल्पाची क्षमता १२.४० दलघमी--
येळगाव धरणाच्या जलसाठ्याची एकूण क्षमता ही १२.४० दलघमी ऐवढी आहे. यंदा अर्धा पावसाळा उलटून गेला तरी या प्रकल्पात केवळ २.४० दलघमी एवढाच जलसाठा असल्याची माहिती आहे. यामुळेच शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा केल्या जात आहे.
दोनच महिने पुरेल एवढेच पाणी
येळगाव धरणात २.४० दलघमी एवढा जलसाठा सद्यस्थितीत उपलब्ध आहे. हा जलसाठा बुलडाणा शहराला पुढील दोन महिने पुरेल एवढा आहे. त्यामुळे आगामी काळात दमदार पाऊस न झाल्यास टंचाईची तीव्रता वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.