नांदुरा, दि. १४- दुर्गादेवीची विसर्जन मिरवणूक घरासमोरून जात असताना दोघा जणांनी मिरवणुकीवर दगडफेक केल्याची घटना तालुक्यातील येरळी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आत्माराम किसन दिवनाले या आरोपीला अटक केली आहे. तालुक्यातील येरळी येथे १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी दुर्गा देवीची विसर्जन मिरवणूक सुरु होती. ही मिरवणूक गावातीलच आत्माराम किसन दिवनाले यांच्या घरासमोरून जात असताना आत्माराम दिवनाले यांच्यासह दोघांनी मिरवणुकीवर दगडफेक केली. यात मिरवणुकीतील काही जणांना किरकोळ मार लागला, तर देवीच्या मूर्तीचीही तुटफूट झाली. याप्रकरणी मंडळाचे उपाध्यक्ष सुभाष नारायण वसतकार यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध कलम २९५, २९६, ३२४ (३४) भादंविचा दाखल करून आरोपी आत्माराम दिवनाले यास अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राठोड करीत आहेत.
येरळीत दुर्गा विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक
By admin | Published: October 15, 2016 2:57 AM