अवैध वृक्षतोड जोमात
सिंदखेडराजा : तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. राखीव जंगले ओस पडत चालली आहेत. सिंदखेडराजा तालुक्यात साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, दुसरबीड, किनगावराजा, सिंदखेडराजा परिसरात अनेक ठिकाणी मोठी झाडे तोडून त्यांचा ढीग लावलेला दिसत आहे.
कृषी सेवा केंद्राच्या तपासणीकडे दुर्लक्ष
देऊळगाव राजा : खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेचे खते, बियाणे तसेच कीटकनाशके उपलब्ध होण्याच्यादृष्टीने कृषी सेवा केंद्राची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, कृषी सेवा केंद्राच्या तपासणीकडे पथकाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
पाण्याची समस्या केव्हा सुटणार
मेहकर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या असते. तात्पुरत्या उपाययोजना करून ही टंचाई तेवढ्या पुरती दूर होते. पावसाळ्यात पाण्याची व्यवस्था झाल्यानंतर त्याकडे पुन्हा लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कायमस्वरूपी पाण्याची समस्या केव्हा सुटणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हिवताप जनजागृती मोहीम
बुलडाणा : जिल्ह्यात गत आठवड्यापासून हिवताप जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. नागरिकांना हिवतापाबद्दल मार्गदशन करून हस्त पत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत जून महिना हिवताप जनजागरण महिना म्हणून राबविण्यात येत आहे.