लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : गत चार वर्षांपासून पाेलीस भरतीची तयारी करीत असलेल्या युवकांना शासनाने भरतीविषयी काढलेल्या शासन आदेशामुळे दिलासा मिळाला हाेता. मात्र, शासनाने हा जीर आर रद्द केल्याने उमेदारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने तातडीने पाेलीस भरती करण्याची मागणी हाेत आहे.
बुलडाणा शहरासह ग्रामीण भागात गत १२वीनंतर अनेक युवक पाेलीस भरतीची तयारी करीत आहेत. शारीरिक चाचणीसह लेखीपरीक्षांची जाेरदार तयारी युवक करीत आहेत. दाेन ते तीन पाेलीस भरतीत काही गुणांनी नियुक्ती न मिळालेले तरुण आणखी जाेमाने तयारी करीत आहेत. यावर्षी काेराेनामुळे पाेलीस भरती हाेईल किंवा नाही याविषयी संभ्रम हाेता. मात्र, शासनाने पाेलीस भरतीचा जीआर प्रसिद्ध केला हाेता. त्यामुळे, युवकांना दिलासा मिळाला हाेता. मात्र ,शासनाने हा जीआर रद्द केल्याने चार ते पाच वर्षांपासून तयारी करीत असलेल्या युवकांमध्ये नैराश्य पसरल्याचे चित्र आहे.
१००० लोकांमागे एक पोलीस
जिल्ह्यात पाेलिसांची २७३२ पदे मंजूर आहेत. त्यातील १६३ पदे रिक्त आहेत. सन २०११च्या जनगणनेनुसर जिल्ह्याची लाेकसंख्या २६ लाखांपर्यंत आहे. लाेकसंख्येचे प्रमाण पाहता एक हजार लाेकांमागे साधारणत: एक पाेलीस असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात संख्येच्या तुलनेत पाेलिसांची पदे वाढवण्याची गरज आहे.
गत चार वर्षांपासून पाेलीस भरतीची तयारी करीत आहेत. शासनाने जीआर काढल्याने आशा पल्लवित झाल्या हाेत्या. मात्र, शासनाने जीआर रद्द केल्याने तयारी करणाऱ्या युवकांमध्ये नैराश्य पसरले आहे. शासनाने तातडीने पाेलीस भरतीची प्रक्रिया सुरू करण्याची गरज आहे. काही मुले वय वाढल्याने अपात्र हाेण्याची वेळ आली आहे.
- राम डहाके, बुलडाणा
पाेलीस भरतीसाठी शहरासह ग्रामीण भागातील मुले तयारी करीत आहेत. अनेकांची दाेन ते तीन गुणांनी संधी हुकलेली आहे. यावेळी शासनाने जागा भरण्याची घाेषणा केल्याने युवकांना दिलासा मिळाला हाेता. मात्र, पुन्हा जीआर रद्द केल्याने युवकांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने वाढती बेराेजगारी पाहता पाेलीस भरती प्रक्रिया सुरू करावी.
अक्षय पाटाेले, बुलडाणा