देऊळगा राजा : शहरामध्ये पिंपळनेर भागात राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेच्या मृत्यूनंतर तिचे आप्तजन न आल्याने शहरातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे तरुण व पोलीस प्रशासन यांच्या वतीने महिलेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यामध्ये महाद्वार चौक मित्रमंडळ, पत्रकार नगरसेवक, पोलीस प्रशासन यांनी मोलाचे सहकार्य केले.
१२ जानेवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने ५० वर्षीय महिला शोभाबाई प्रभू राठोड यांचे निधन झाले. त्या पिंपळनेर परिसरात राहात होत्या. स्थानिक तीन तरुणांनी त्यांना त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉ. वैशाली मान्टे यांनी तपासणी केल्यानंतर मृत झाल्याचे घोषित केले . या घटनेची माहिती रुग्णालयाच्या वतीने पोलिसांना देण्यात आली. याप्रसंगी ठाणेदार संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ. केशव मुळे, पोलीस नाईक तुळशीराम गुंजकर, विजय गिते, महिला पोलीस कर्मचारी शीतल नांदे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सूरज गुप्ता यांनी निराधार महिलेच्या अंत्यसंस्कारासाठी सोशल मीडियावर आवाहन केले. भाजपचे युवा नेते मल्हार वाजपे, गजानन धावणे, लखन कुंटे याचबरोबर महाद्वार चौक मित्रमंडळाच्या कायकर्त्यांनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. ग्रामीण रुग्णालयात डॉ. शुभम पवार यांनी शवविच्छेदन केले. यावेळी सामाजिक बांधिलकी जोपासत महाद्वार चौक मित्रमंडळाचे मल्हार वाजपे ,गजानन धावणे ,लखन कुंटे, सुरज गुप्ता यांनी पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून सदर महिलेचे अंत्यसंस्कार करण्याबाबत आवश्यक त्या सूचना पाळत पालिका कर्मचाऱ्यांचे सहकार्य घेऊन अंत्यसंस्कार केले. सदर महिलेचे कोणीही नातेवाईक न आल्याने महाद्वार चौक मित्रमंडळाने सामाजिक बांधिलकी जोपासली,