- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सातपुड्याच्या पर्वत रांगेतील जैव विविधततेचे संवर्धन करण्याचा निर्धार ‘तरूणाई’ने केला. राज्यातील १८ जिल्ह्यातील तरूणाईने ‘आपना सातपुडा’ या राज्यस्तरीय जैवविविधता शिबिरात पर्यावरण रक्षणासोबतच जैवविविधतेचे संवर्धन करण्यासाठी विविध ठरात संमत केले. निमित्त होते ते तरूणाई फांउडेशन, खामगाव आणि महात्मा गांधी लोकसेवा संघाच्यावतीने जळगाव जामोद तालुक्यातील सालईबन येथे आयोजित तीन दिवसीय ‘आपना सातपुडा’ राज्यस्तरीय जैवविविधता शिबिराचे. या शिबिराच्या उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी जळगाव जामोद वनपरिक्षेत्र अधिकारी खान होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुमार शिराळकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी.पडोळ, साहित्यिक नरेंद्र लांजेवार, सरपंच विजया पुंडलिक पाटील, तरूणाईचे मनजीतसिंह शिख, डॉ. धीरज देशमुख, डॉ. नेहा काळे, उमेश खाडे, डॉ. प्रवीण भस्मे यांची उपस्थिती होती. संचालन प्रताप मारोडे यांनी केले. आभार उमाकांत कांडेकर यांनी मानले.
पर्यावरणासंबंधीत विविध विषयांवर चर्चासत्र!तीन दिवसीय राज्यस्तरीय संमेलनात हवामान बदल, जंगल आणि पाऊस या विषयावर गांधी नगर, गुजरात येथील डॉ. प्रवीण भस्मे यांनी मार्गदर्शन केले. नाशिक येथील डॉ निलिमा जोरवार यांनी रानभाज्या, नैसर्गिक वनस्पती आणि मिलेटबाबत (देवधान्य) माहिती दिली. अमरावती येथील दिशा वाईल्ड लाईफचे यादव तरटे यांनी जैव विविधता: प्राणी- पक्षी आणि झाडांबाबत आणि हवामान बदलाबाबत मुंबई येथील डॉ. निधीन आणि डॉ. सेजल तांबट यांनी मार्गदर्शन केले. तर वनऔषधींबाबत सुरेश टाकर्डे यांनी सखोल मार्गदर्शन केले. १८ जिल्ह्यातील तरुणांचा सहभाग!बुलडाणा जिल्ह्यातील सालईबन येथे पार पडलेल्या जैवविविधता शिबिरात महाराष्ट्रातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, परभणी, नागपूर, बीड, अहमदनगर, जालना, धुळे, नंदुरबार, जळगाव खांदेश, सातारा, पुणे, अकोला, वाशीम, बुलडाणा आणि पालघर जिल्ह्यातील तरूणांचा समावेश होता.