धामणगाव बढे : घराच्या बांधकामावर मोटारच्या साहाय्याने पाणी मारत असताना विजेचा शॉक लागून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी खेडी पान्हेरा येथे घडली. खेडी पान्हेरा येथील उमेश पांडुरंग लाजगे रोजगार सेवक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या घराचे बांधकाम सुरु होते. शनिवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास बांधकामावर पाणी मारण्यासाठी ते गेले होते. मोटार सुरु करताच त्यांना अचानक विजेचा शॉक लागला. त्यामुळे ते जमिनीवर कोसळले. तत्काळ त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. परंतू डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. उमेश हे आई -वडिलांचे एकुलते एक मुल होते. त्यांच्या अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नेहमी हसत चेहरा व मदतीसाठी धावून येण्याची वृत्ती यामुळे ते परिसरात परिचित होते. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी उमेशच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करीत श्रध्दांजली वाहिली. मोटार व कुलरमध्ये पाणी टाकतांना शॉक लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन केले. रविवारी दुपारी खेडी येथे उमेश यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
घराच्या बांधकामावर पाणी मारताना शॉक लागून युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 3:51 PM