नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा
देऊळगावराजा : तालुक्यातील रोहणा, टाकरखेड परिसरात १८ फेब्रुवारी राेजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यावेळी बहुतांशी ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचा हरभरा, गहू, शाळू, मका, कांदा व फळबागांसह पालेभाज्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे.
‘मी जबाबदार अभियान’ यशस्वी करा
देऊळगावमही : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही अनेक नागरिक तोंडाला मास्क न वापरता, गर्दीच्या ठिकाणी एकत्रित येताना दिसून येतात. त्यामुळे कोरोनाला रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत जात असून, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रत्येकाने ‘मी जबाबदार’ हे अभियान यशस्वीपणे राबवावे, असे आवाहन सरपंच लक्ष्मी रामकिसन म्हस्के यांनी केले आहे.
हडपलेला प्लॉट परत परत देण्याची मागणी
बुलडाणा : शहरातील सागवन परिसरातील स्वामी समर्थनगर येथे दगडी पाण्याच्या टाकीजवळ पाच ते सहा गुंठे प्लॉट काही लाेकांनी हडपला आहे. त्यामुळे हा प्लॉट परत मिळवून देण्याची मागणी मिलिंद गाेविंद झिने यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
लाेणार येथे विज्ञान दिवस साजरा
लाेणार : स्थानिक दुर्गा क.बनमेरु विज्ञान महाविद्यालयात २८ फेब्रुवारी राेजी राष्टीय विज्ञान दिवस ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.प्रकाश बनमेरु हाेते, तर प्रमुख अतिथी म्हणून डाॅ.पंडित विद्यासागर उपस्थित हाेते. प्रा.कमलाकर वाव्हळ यांनी विविध स्पर्धामध्ये पारिताेषिक जिंकणाऱ्यांची नावे जाहीर केली.
विज्ञान संशोधनातून सर्वसामान्यांची सेवा करावी
हिवरा आश्रम : खऱ्या अर्थाने दरिद्री नारायणाची सेवा विज्ञानाच्या प्रगतीतून व संशोधनातूनच होत आहे, असे उद्गार विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी यांनी काढले. ते राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना बाेलत हाेते.