लाेणार : एका बारमध्ये जेवणासाठी गेलेल्या काही तरुणांमध्ये जुना वाद उफाळून आला. या वादातून एका युवकावर चाकू, कटरने हल्ला केला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना ९ जुलै राेजी रात्री घडली. या प्रकरणी तिन्ही आराेपींना अटक करण्यात आली आहे. रितेश सुनील मापारी (वय २०) असे मृतकाचे नाव आहे.
लोणार येथील रितेश सुनील मापारी हा अविनाश राजेंद्र सरकटे व त्याच्या काही मित्रांसोबत मंठा रोडवरील एका बारमध्ये जेवणासाठी गेला हाेता. तेथे आगोदरच जेवणासाठी उपस्थित असलेल्या शुभम उर्फ विशाल भारस्कर, रा. गारटेकी, ता. मंठा, शुभम नारायण मापारी रा. लोणार व उदय विनोद सातपुते रा. मातरखेड, ता. लोणार यांनी रितेशसोबत जुन्या वादावरून शिवीगाळ केली. यावेळी रितेश मापारी याने तिघांनाही शिवीगाळ न करण्याचे सांगितले असता शुभम नारायण मापारी, तसेच उदय विनोद सातपुते या दोघांनी रितेशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व त्याचे दोन्ही हात पकडून ठेवले.
तसेच शुभम उर्फ विशाल भारस्कर याने रितेशच्या पोटात चाकू-कटरने खोलवर वार केले. यामध्ये गंभीररीत्या जखमी झालेल्या रितेशला त्याच्या मित्रांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्रथमाेपचार केल्यानंतर त्याला मेहकर येथे नेण्यास सांगितले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला अकाेला येथे हलवण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रितेशचा मृत्यू झाल्याचे समाेर आले. रितेशच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणार पोलिसांनी शुभम उर्फ विशाल भारस्कर, उदय विनोद सातपुते, शुभम नारायण मापारी या तिन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
आराेपींचा पाठलाग करून केली अटकघटनेचे गांभीर्य ओळखत मेहकर उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निमिष मेहेत्रे यांनी एक विशेष पथक तयार करत आरोपीच्या मागावर पाठवले. या पथकामध्ये नापोका संतोष चव्हाण, नापोका संजय जाधव, पोकाॅ गणेश लोढे, पो.काॅ. गजानन डोईफोडे, पो.काॅ. अनिल शिंदे यांनी आरोपीचा पाठलाग करत त्यांना अटक केली. या घटनेचा पुढील तपास लोणार पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निमेश मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणार पोलिस करत आहे.