किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार: राजकारणात तरुणांचा सहभाग वाढून तरुणांच्या नेतृत्वात पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रमुख पक्षश्रेष्ठींनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये जो तरुणाईचा पॅटर्न वापरला तोच पॅटर्न ग्रामपंचायत निवडणुकीतसुद्धा वापरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये पक्षापेक्षा सुशिक्षित तरुण व प्रस्थापितांमध्ये खर्या अर्थाने गावातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, मोर्चेबांधणीस आलेला वेग पाहता बहुतांश गावांत चुरशीच्या लढतीचे संकेत आहेत. थेट जनतेतून सरपंच निवडीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना राजकारणात एंट्री मारण्याची व गावाचे नेतृत्व करण्याची एक नामी संधी उपलब्ध झाली आहे. तालुक्यात होऊ घातलेल्या ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तरुण वर्ग सरसावला आहे. तर नवनव्या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता जुन्या नेतृत्वापेक्षा तरुणांमध्येच अधिक आहे. शिवाय तरुणांमध्ये विकासात्मक कामे करण्याची विचारक्षमता व इच्छाशक्ती असल्याची ग्रामस्थांना जाणीव होत आहे. त्यामुळे गावपातळीवर तरुणांच्या नेतृत्वास जनाधारदेखील मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तरुण नेतृत्वाच्या धसक्याने अनेक गावात राजकीय समीकरणांच्या जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. सुशिक्षित तरुणांमध्ये राजकारणातील भ्रष्टाचाराबाबत तिरस्कार असून ग्रामविकासाबाबत ते सजग आहेत. गावाच्या प्रत्येक निर्णयात सहभाग घेणारा तरुण वर्ग थेट सरपंच निवडणुकीच्या रिंगणात प्रत्यक्ष उतरण्यासाठी सज्ज झाला असल्याने तालुक्यातील प्रमुख पक्ष काय निर्णय घेतील याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
राजकीय वातावरण तापले३९ ग्रामपंचायती ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांकडून व्यूहरचना आखण्यास सुरुवात झालेली आहे. राजकीयदृष्ट्या गतवेळी बहुतांश ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे प्राबल्य होते. जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिवसेनेने सुलतानपूर गटामधील राष्ट्रवादीची टिकटिक बंद करून भगवा फडकविलेला आहे. तसेच पांग्रा डोळे जिल्हा परिषद सर्कलमध्येही पंजाला हात दाखवत शिवसेनेने भगवा फडकविलेला आहे; मात्र हिरडव जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विजय मिळविला होता.
गावनिहाय सरपंच पदाचे आरक्षणतालुक्यातील चिंचोली सांगळे सर्वसाधारण, येवती सर्वसाधारण महिला, सरस्वती अनु. जाती महिला, गायखेड सर्वसाधारण महिला, शारा ना.मा.प्र., गुंजखेड सर्वसाधारण महिला, बागुलखेड सर्वसाधारण , पहूर सर्वसाधारण महिला, दाभा सर्वसाधारण महिला, जांबूल अ. जाती, आरडव अ. जमाती, पिंपळनेर सर्वसाधारण, वढव ना.मा.प्र., मांडवा ना.मा.प्र. महिला, चोरपांग्रा सर्वसाधारण, भूमराळा अ. जाती. महिला, वझर आघाव ना.मा.प्र., सावरगाव तेली सर्वसाधारण महिला, चिखला सर्वसाधारण महिला, पळसखेड सर्वसाधारण, भानापूर अ.जाती , मोहोतखेड नामाप्र महिला, वेणी सर्वसाधारण, वडगाव तेजन ना.मा.प्र. महिला, सुलतानपूर अ.जाती महिला, टिटवी सर्वसाधारण, धाड ना.मा.प्र. महिला, खुरमपुर सर्वसाधारण महिला, अजीसपूर सर्वसाधारण, नांद्रा अ. जाती, रायगाव अ. जमाती, गंधारी सर्वसाधारण, सावरगाव मुंढे सर्वसाधारण, कारेगाव ना.मा.प्र., तांबोळा सर्वसाधारण महिला, धानोरा सर्वसाधारण महिला, शिवणी पिसा ना.मा.प्र., महारचिकना ना.मा.प्र., ब्राह्मणचिकना सर्वसाधारण महिला याप्रमाणे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर असून, या ३९ ग्रामपंचायतींपैकी शारा, वेणी, सुलतानपूर, अजीसपूर, दाभा या ग्रामपंचायतींमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.