बुलडाणा : धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देऊनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याने संतप्त झालेल्या मोताळा तालुक्यातील एका २२ वर्षीय तरुणाने सोमवारी सकाळी बुलडाणा येथील बीएसएनएल कार्यालयाच्या आवारातील तीनशे फूट टॉवरवर चढून आंदोलनाला सुरुवात केली.
सोनाजी शांताराम पिसाळ असे या तरुणाचे नाव असून, तो मोताळा तालुक्यातील वरुळी येथील रहिवासी आहे. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत टॉवरवरून खाली उतरणार नसल्याचा पवित्रा या तरुणानी घेतला आहे.
मेंढपाळांच्या चराई क्षेत्र मोकळे करून देण्यात यावे, मेंढपाळांना संरक्षण देण्यात यावे, वन रक्षकांकडून मेंढपाळांवर होणारे अन्याय अत्याचार थांबवावेत, धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस प्रशासन अग्निशामक घटनास्थळी दाखल झाले असून त्याला खाली उतरण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात असलेल्या टॉवरवर जडून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याची ही तिसरी घटना आहे, गेल्या तीन तासापासून हा युवक टॉवरवर चढून आंदोलन करत आहे