मोताळा : आधारकार्डसाठी युवकाने येथील मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. कागदपत्रांची जुळवाजुळव करूनही आधारकार्ड मिळू शकले नसल्यामुळे त्याने संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली.तालुक्यातील तालखेड येथील काशीराम महादेव मानकर (२९) हे ११ वर्षांपासून पुण्यात मजुरी करून कुटुंबाचा पालनपोषण करतात. त्यांना पत्नी, दोन मुले व एक मुलगी आहे. त्यांची तिन्ही मुले व स्वत: काशीराम मानकर यांच्याकडे आधारकार्ड नाही. दरम्यान, आधारकार्ड बनवण्यासाठी त्यांनी ग्रामसेवकाचा दाखला व इतर कागदपत्रांची जुळवाजुळव करून मोताळा येथील आधारकार्ड केंद्रावर पोहचले. परंतु दाखल्यावरील ग्रामसेवकाचा शिक्का योग्य ठिकाणी नसल्याने केंद्र चालकाने त्यांना परत पाठवले. पुन्हा कागदपत्रावर शिक्का घेऊन गेल्यावरही काम झाले नाही. त्यामुळे काशीराम मानकर यांनी रागाच्या भरात शनिवारी दुपारी दोन वाजता मोताळा बसस्थानका जवळच्या एका मोबाईल टॉवरवर चढून विरूगिरी केली. दरम्यान, बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्याने तालखेड येथील पं.स. उपसभापती पती कुंवरसिंग परमार यांनी घटनास्थळी येऊन आधारकार्डबाबत तोडगा काढावा, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी कुंवरसिंग परमार यांना घटनास्थळी पाचारण केले. त्यानंतर काशीराम मानकर टॉवरवरून खाली उतरले. (तालुका प्रतिनिधी)
आधारकार्डसाठी युवकाचे टॉवरवर चढून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 3:36 PM