बुलडाणा: भाजपला धोबीपछाड देत जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदावर कब्जा करत महाविकास आघाडीने मिनी मंत्रालयात नवी इन्हींग सुरू केली असतानाच २१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने आपला दबदबा कायम ठेवला आहे. दरम्यान, पक्षादेश झुगारणाऱ्या शिवसेनेच्या एका जिल्हा परिषद सदस्याची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी केली आहे.विषय समिती सभापती पदांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये ठरलेल फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थ व बांधकाम, काँग्रेसला महिला व बालकल्याण तर शिवसेनेला कृषी व पशुसंवर्धन समिती सभापतीपद देण्यात आले आहे. यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेच्या शिवाजी सभागृहामध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये काँग्रेसच्या ज्योती अशोक पडघान यांना महिला व बालकल्याण, शिवसेनेच्या राजेंद्र पळसकर यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन तर राष्ट्रवादी काँग्रेसचे रिजाय खाँ पठाण यांना अर्थ व बांधकाम सभापतीपद देण्यात आले. समाज कल्याण समिती सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पुनम राठोड यांची वर्णी लागली.जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवडणूक अविरोध झाली होती. त्याप्रमाणे विषय समिती सभापती पदांचीही निवडणूक अविरोध होईल, असे वाटत होते. मात्र भाजपतर्फे तिन्ही सभापती पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने शेवटी या पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. समाज कल्याण समिती सभापती पदासाठी सरस्वती वाघ आणि पुनम राठोड यांनी अर्ज दाखल केले होते. त्यात पुनम राठोड विजयी झाल्या. त्यांना ३३ तर वाघ यांना २४ मते पडली. महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी काँग्रेसकडून ज्योती पडघान व भाजपकडून रुपाली काळपांडे यांनी अर्ज दाखल केले होते. यात काळपांडे यांना २४ तर ज्योती पडघान यांना ३३ मते मिळाली. शिवसेनेकडून कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती पदासाठी राजेंद्र पळसकर यांनी तर विरोधी पक्षाकडून मालुताई मानकर यांनी अर्ज दाखल केला होता. त्यात पळसकर विजयी झाले. अर्थ व बांधकाम सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे रियाज खाँ पठाण विजयी झाले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहूल बोंद्रे, लक्ष्मण घुमरे, शिवसेनेचे आ. संजय गायकवाड, जिल्हा शिवसेना प्रमुख जालिंदर बुधवत, काँग्रेसचे सुनील सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी प्रामुख्याने उपस्थित होते.