राजेश शेगोकार /बुलडाणा: जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असून, राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जि.प.सदस्यांना विविध पदावर बसविताना सव्वा वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सव्वा वर्षाचा कालावधी झालेल्या पदाधिकार्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय प्रजासत्ताकदिनी झालेल्या राष्ट्रवादीच्या एका बैठकीत घेण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. बुलडाणा जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता स्थापन करताना विविध पदांचे वाटप केले होते. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसकडे जि.प. उपाध्यक्ष पद, महिला व बाल कल्याण तसेच कृषी व पशुसंवर्धन सभापती पदे देण्यात आली होती. या पदावर नियुक्ती करताना पदाधिकार्यांना सव्वा वर्षाचा कालावधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी घेतला होता. त्यानुसार उपाध्यक्षपदी पांडुरंग खेडेकर, महिला व बाल कल्याण सभापतीपदी आशा झोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी सुलोचना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आता या पदाधिकार्यांचा सव्वा वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे दुसर्या पदाधिकार्यांना संधी देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हालचाली सुरू झाल्या आहेत. त्या अनुषंगाने राष्ट्रवादीच्या निवडक पदाधिकार्यांची विशेष बैठक प्रजासत्ताकदिनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यांच्या बंगल्यावर पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अँड.नाझेर काझी उपस्थित होते. यावेळी सव्वा वर्षाचा कार्यकाळ झालेल्या या सर्व पदाधिकार्यांचे राजीनामे घेण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती पदाधिकार्यांना देण्यात आली. यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती यांचे पती शरदचंद्र पाटील अनुपस्थित असल्याने याबाबतचा निर्णय त्यांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात आला आहे. या बैठकीमुळे जिल्हा परिषदेच्या वतरुळात राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या बैठकीत ठरल्याप्रमाणे जर पक्षाने या पदाधिकार्यांचे राजीनामे घेतले, तर राष्ट्रवादीतील काही जि.प. सदस्यांची येथे वर्णी लागू शकते.
जिल्हा परिषदेत होणार पदाधिका-यांची खांदेपालट!
By admin | Published: January 28, 2016 12:23 AM