बुलडाणा : अकाेला जिल्हा परिषदेच्या वतीने काेविड केअर सेंटर सुरू करण्यात आल्यानंतर बुलडाण्यातही असे सेंटर सुरू करावे, असे वृत्त वृत्त ‘लाेकमत’ने प्रकाशित केले हाेते. या वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने सुसज्ज ५० खाटांचे काेविड केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरच्या राजर्षी शाहू सभागृहात काेविड सेंटरच्या कामास सुरुवातही झाली आहे.
जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या संकल्पनेतून आणि जि.प.च्या विविध कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरू होत आहे. जिल्ह्यात वाढत्या रुग्णांची संख्या व मृत्यूचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा परिषद कर्मचारी व कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत अद्ययावत असे हे कोविड केअर सेंटर उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. अवघ्या काही दिवसांत हे सेंटर रुग्णांच्या सेवेत कार्यान्वित होणार आहे. विशेष म्हणजे पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, संजय चोपडे, शिक्षण अधिकारी सचिन जगताप, विविध संवर्गातील संघटनांचे पदाधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत. विशेष म्हणजे जि.प.च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार या कोविड केअर सेंटरला देण्याचा निर्णय घेतला असून, अधिकारीसुद्धा प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत करणार आहेत. जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांच्या चर्चेतून कोविड केअर सेंटर सुरू करण्याचा ठराव मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सभापती व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला. या ठरावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
काेविड केअर सेंटर हाउसफुल्ल
जिल्ह्यातील २४ कोविड केअर सेंटरसह शासकीय व खासगी रुग्णालये रुग्णांनी हाऊसफुल्ल झाली आहेत. कोणत्याही रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे रुग्णांची हेळसांड होत आहे. बेड मिळालाच तर रेमडेसिविर इंजेक्शन आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. आजमितीस जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ७० हजारांच्या वर पोहोचली आहे.
उपचार पूर्णपणे हाेणार माेफत
मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी नागरिकांना तातडीने सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेच्या विभाग प्रमुखांच्या पुढाकाराने व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राच्या रायगड या इमारतीत सुसज्ज अद्ययावत कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. पूर्णपणे मोफत सुविधा असणाऱ्या या सुसज्ज कोविड केअर सेंटरचे काम झपाट्याने सुरू आहे. डॉक्टर्स, नर्स व इतर मनुष्य बळ मिळताच कोविड सेंटर कार्यान्वित होऊन रुग्णसेवेत रुजू होणार आहे. या सेंटरमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांसाठी काही खाटा राखीव राहणार आहेत.