लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त एका शिक्षिकेचा ‘आदर्श’ सत्कार नुकताच तालुक्यातील निपाणा येथील जिल्हा परिषद शाळेत पार पडला. शिक्षिकेला गौरव पुरस्कार मिळाल्याचा अनोखा आनंद व्यक्त करीत विद्यार्थीनींनी शिक्षिकेचे औक्षण करून पेढा भरविला.
खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा निपाणा येथील उपक्रमशील शिक्षिका अलका विष्णू धाडे-सपकाळ यांना गुरूपोर्णिमेच्या मुहूर्तांवर शुक्रवारी जिल्हा गौरव शिक्षक पुरस्काराने बुलडाणा येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर शिक्षिका सपकाळ या शनिवारी प्रथमच शाळेत पोहोचल्या. त्यावेळी शाळेतील विद्यार्थींनींनी या शिक्षिकेचा एका छोटेखानी समारंभात ‘आदर्श’ सत्कार केला. शिक्षिकेचे औंक्षण करून पेढा भरविला. तर काही विद्यार्थींनींनी शिक्षिकेच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षिका होण्याचे मनोगतही व्यक्त केले.
शिक्षिकेच्या नाविण्यपूर्ण कार्याची दखल!
शैक्षणिक कार्यात शिक्षिका अलका धाडे-सपकाळ यांनी राबविलेल्या विविध नाविण्यपूर्ण उपक्रमाची दखल जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली. ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’, वैज्ञानिक दृष्टीकोन, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत विविध उपक्रम राबविले आहेत.