लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात फरार असतानाही आरोपी शिक्षिकेस माहिती पुरविण्यात तत्परता दाखविण्यासोबतच सदर शिक्षिकेच्या निलंबनासाठी जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. एकाच वेळी एमएड महाविद्यालय आणि शाळेवरही हजर असल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आल्याने, जिल्हा परिषद शिक्षिका कल्पना ठग यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा ४ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आला; मात्र गुन्हा दाखल झाल्यापासूनच संबंधित शिक्षकेच्या निलंबनाला जिल्हा परिषद प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान, कल्पना ठग यांच्या फसवणूक प्रकरणात शासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याने, खामगाव येथील संजय वर्मा यांनी न्यायालयात फौजदारी प्रकरण दाखल केले आहे. हे प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असतानाच जिल्हा परिषद प्रशासनाकडून ठग यांना पाठीशी घातल्या जात असल्याचे दिसून येते. दरम्यान, फरार आरोपीस जिल्हा परिषद प्रशासनाने माहिती पुरविल्याचे उघडकीस आल्याने तसेच दोन महिन्यांपासून या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाच्या भूमिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.
असे आहे प्रकरण!बुलडाणा पंचायत समिती अंतर्गत चिखला येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असतानाच सन २0१२-१३ मध्ये नियमीत बीएड अभ्यासक्रमासाठी तर २0१३-१४ मध्ये एमएड अभ्यासक्रमासाठी त्यांनी शाहू महाराज महाविद्यालय माळविहिर येथे प्रवेश घेतला होता. यासाठी त्यांनी कोणत्याही सक्षम अधिकार्याची परवानगी घेतली नाही. त्याचवेळी चिखला येथील शाळेतील हजेरीपत्रकावर स्वाक्षरी केल्याचे दिसून आले. याप्रकरणी ४ सप्टेंबर रोजी ठग यांच्याविरोधात कलम ४२0 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलंबन व खाते चौकशीचे आदेश परत!फसवणूक प्रकरणात दोषी आढळल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी दीपा मुधोळ यांनी कल्पना ठग यांच्या निलंबन व खाते चौकशीचे आदेश १0 सप्टेंबर २0१५ रोजी दिले होते. दरम्यान, अवघ्या सहा दिवसांमध्ये म्हणजेच १६ सप्टेंबर २0१५ रोजी परत घेतले होते. या कार्यकाळात ठग यांच्या भगिनी वैशाली ठग शिक्षणाधिकारी होत्या.
अटकपूर्व जामिनासाठी परवनागीसंदर्भात सांगता येणार नाही; मात्र जिल्हा परिषद शिस्त व अपील नियमातंर्गत एखाद्याने ४८ तासापेक्षा जास्त काळ पोलीस कस्टडीत काढल्यास निलंबनाची तरतूद आहे. दरम्यान, शिक्षिका कल्पना ठग यांच्या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासनाचा कोणताही हस्तक्षेप नाही. ठग यांच्या प्रकरणातील फाइल सामान्य प्रशासन विभागात सादर करण्यात आली आहे. यासंदर्भात लवकरच कारवाईचे संकेत आहेत.- एन.के. देशमुख,शिक्षणाधिकारी, जि.प. बुलडाणा.