- योगेश देऊळकार लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : येथे वनविभागाअंतर्गत असलेल्या राणी बागेत बच्चेकंपनीसह थोरांच्या मनोरंजनासाठी झोराबिक बॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. राणी बागेला लागून असलेल्या संगम तलावात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राणी बागेकडे शहरातील नागरिकांसह पर्यटकांचा कल वाढविण्यासाठी वनविभागाच्या वतीने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.थंड हवेचे ठिकाण म्हणून बुलडाण्याची ओळख असली तरी येथे बालकांच्या खेळण्यासाठी उद्यानांची फारसी व्यवस्था नाही. त्यामुळे बालकांना खेळण्यासाठी हक्काची जागा उपलब्ध होऊ शकत नाही. बालकांना भासणारी हीच उणीव भरून काढण्यासाठी वनविभागाच्या वतीने पाऊल उचलण्यात येत आहे. येथे वेगवेगळ्या प्रकारची खेळणी बसविण्यात आली आहेत. यामुळे आता सुटीच्या दिवशी बालकांना खेळण्यासाठी हे एक चांगले ठिकाण उपलब्ध झाले आहे. याठिकाणी राणी बाग खूप पूर्वीपासून अस्तीत्वात आहे. परंतु या ठिकाणी याआधी पुरेसी खेळणी व मनोरंजनाची साधने उपलब्ध नसल्याने बालकांनी याकडे पाठ फिरविली होती. बालकांसह नागरिक व पर्यटकांचा कल राणी बागेकडे वाढविण्यासाठी वन विभागाने विशेष उपक्रम सुरू केला आहे. वनविभागाच्याच अंतर्गत येणाऱ्या संगम तलावात झोराबिक बॉलची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे बालकांसह त्यांच्या पालकांचेही मनोरंजन होत आहे.या बॉलमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यामध्ये हवा भरून तो पाण्यात सोडण्यात येतो. जवळपास १० ते १५ मिनीटे बॉलमध्ये बसून किंवा उभे राहून तलावात फिरण्याचा आस्वाद घेता येतो. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत याठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहेत. हे काम पाहण्यासाठी याठिकाणी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या बॉलला दोरी बांधण्यात आली असून बॉलमध्ये बसणाºया व्यक्तीस बाहेर यायचे असल्यास तेथे हजर असलेल्या कर्मचाºयाला आवाज देऊन ती व्यक्ती बॉलमधून बाहेर येऊ शकते.मनोरंजनासाठी सदर बॉल पाण्यावर उपलब्ध करून देण्यात आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी याठिकाणी हजर असलेले कर्मचारी तत्पर आहेत. संगम तलावात पोहण्यासाठी शौकीनांची दररोज गर्दी असते. मात्र ज्यांना पोहता येत नाही अशांना तलावात फिरण्यासाठी हा बॉल अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. फिरण्यासाठी व निसर्गरम्य ठिकाणाचा आस्वाद घेण्यासाठी इतरत्र जाणाºयांना आता शहरातच ही सुविधा मिळणार आहे. पर्यटकांसाठी ही निश्चितच आनंदाची बाब आहे.
सौंदर्यीकरणाची गरजयेथील राणी बागेमध्ये मोठमोठी झाडे आहेत. एवढेच नव्हे तर इतर शोभेची छोटीछोटी झाडेदेखील लावण्यात आली आहेत. मात्र याठिकाणी स्वच्छतेचा अभाव दिसून येत आहे. अनेक ठिकाणी लॉनवरील व इतरत्र गवत सुकेलेले आढळून येत आहे. यामुळे सध्या याठिकाणी फारसे थांबावे वाटत नाही. येथे खºया अर्थाने रमनीय वातावरण निर्मिती करण्यासाठी या बागेचे सौंदर्यीकरण करण्याची गरज आहे. याठिकाणी आकारण्यात येणाºया नाममात्र प्रवेश शुल्काच्या रकमेतून येथे आणखी नवनवीन सुविधा उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.