धामणगाव बढे(जि. बुलडाणा), दि. १२- येथील जि.प. मराठी कन्या शाळा लवकरच ई- लर्निंग स्कूल होणार असून, दात्यांच्या मदतीतून आणि लोकवर्गणीतून शाळेतील मुलींना ई- तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आधुनिक डिजिटल शिक्षणाची ओळख होईल. मोताळा तालुक्यातील अनेक जि.प. शाळा डिजिटल स्कूल म्हणून नावारुपास येत असतानाच जि.प.शाळासुद्धा त्यामध्ये मागे नाही. धामणगाव बढे येथील जि.प. कन्या शाळेमध्ये एकूण १५२ विद्यार्थिनी १ ते ४ वर्गामध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये ६ शिक्षकांचा स्टॉफ आहे. शाळेतील शिक्षकांनी ही शाळा डिजिटल शाळा करण्यासाठी काही रक्कम टाकून तथा गावातील दात्यांकडून व लोकवर्गणीतून प्रयत्न केले आहेत.यासाठी ग्रामपंचायत धा.बढे तर्फे सरपंच अयोध्या दिनकर बढे, ग्रामपंचायत सदस्य ममता राजेश मोदे, सोमेश्वर अर्बन शाखा धामणगाव बढे यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत दिली, तर गावातूनसुद्धा अनेक दात्यांनी मदत दिली. त्यामुळे आता प्रोजेक्टरसह इतर साहित्य उपलब्ध होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक दामोधर पाटील तथा सर्व सहायक शिक्षक त्यासाठी प्रयत्नरत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनासुद्धा यामुळे आधुनिक शिक्षणाची ओळख होणार असून, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या ज्ञानात भर पडेल, तसेच जि.प.मराठी मुलांची शाळादेखील लवकरच डिजिटल शाळा होणार असल्याचे मुख्याध्यापक माहुरे यांनी सांगितले.
जि.प.मराठी कन्या शाळा होणार ई-लर्निंग स्कूल
By admin | Published: October 13, 2016 2:07 AM