मुंबई : अलीकडेच ४७० नव्या विमानांच्या खरेदीची घोषणा केलेल्या एअर इंडिया कंपनीने आता यंदाच्या वर्षात ९०० वैमानिक आणि ४२०० केबीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा मेगा प्लॅन जाहीर केला आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या ताफ्यात नवीन विमाने दाखल होतानाच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत पातळीवरील अनेक नव्या मार्गांवर विमानसेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. यासाठी कंपनीने नव्या कर्मचाऱ्यांच्या भरतीची ही योजना सुरू केली आहे. देशाच्या सर्व भागांतून ही भरती करण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना १५ आठवड्यांचे सुरक्षा आणि सेवा कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये अभ्यासक्रम आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षणाचा समावेश आहे.
११०० कर्मचाऱ्यांचे ७ महिन्यांपासून प्रशिक्षणमार्च २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या कालावधीमध्ये कंपनीने एकूण १९०० नव्या केबिन कर्मचाऱ्यांची भरती केली असून ११०० कर्मचाऱ्यांचे सात महिन्यांपासून प्रशिक्षण सुरू आहे तर ५०० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले असून ते सेवेमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान, ४७० नव्या विमानांच्या खरेदी योजनेसोबतच कंपनीने आणखी ३६ विमाने भाडेतत्त्वावर घेण्याची घोषणा केली असून यापैकी २ विमाने कंपनीच्या ताफ्यात नुकतीच दाखल झाली आहेत.