तुम्ही नोकरी शोधत असाल, तर आपला बायोडाटा प्रभावी हवा. बायोडाटात काही गोष्टी अवश्य असल्या पाहिजेत; पण काही गोष्टी टाळणेही आवश्यक आहे. बायोडाटामध्ये अजिबात असता कामा नयेत, अशा गोष्टींविषयी आपण आज जाणून घेऊ या.
केवळ ‘जेडी’ नको!
सरासरी मुलाखतकर्ते उमेदवाराचा बायोडाटा पाहण्यासाठी अवघे ६ सेकंद देतात. त्यामुळे बायोडाटात आपण केलेल्या कामाचे केवळ वर्णन म्हणजे ‘जॉब डिस्क्रिप्शन’ (जेडी) लिहिणे टाळावे. काम किती महत्त्वाचे आहे, हे ठसविण्यासाठी प्रत्येक मुद्द्याच्या आधी ‘ड्रोव्ह,’ ‘अक्वायर्ड,’ ‘डेव्हलप्ड’ असे मजबूत कृतिदर्शक शब्द असायला हवेत.
अव्यावसायिक पात्रता टाळा
अनेकजण आपल्याला नोकरी का हवी आहे, हे बायोडाटात लिहितात. हे लिहायची अजिबातच गरज नाही. तुम्ही अप्लाय केले, याचा अर्थच तुम्हाला नोकरी हवी आहे. याशिवाय अव्यावसायिक पात्रता (क्रेडेन्शिअल्स) बायोडेटात पूर्णत: टाळायला हव्यात. अव्यावसायिक ई-मेल टाळावे. जसे की, ‘Yashwant7474749@gmail.com. अनेक मोबाईल क्रमांक आणि अनेक ई-मेल पत्ते देणेही टाळावे. अशा प्रकारातून तुमचे व्यक्तिमत्त्व फाफटपसारा महत्त्वाचा मानते, असा संदेश जातो.
कालबाह्य अभ्यासक्रम टाळा
कालबाह्य झालेल्या अभ्यासक्रमांची जंत्री देणे टाळावे; कारण असे अभ्यासक्रम तुम्ही अर्ज केलेल्या नोकरीसाठी शून्य उपयोगाचे असतात. उदा. पदवी घेतली असेल, तर सोबत मॅट्रिक पास असे लिहिण्याची गरज नसते. तसेच कालबाह्य अभ्यासक्रमांचेही आहे. कालबाह्य अभ्यासक्रम प्राथमिक पातळीवरचे असतात. त्यांना काहीच महत्त्व उरलेले नसते.
खूप डाटा नकोच
मुलाखतकर्ते काम केलेल्या कंपन्या आणि हाताळलेले प्रकल्प तसेच त्यांचे आजचे महत्त्व हेच प्रामुख्याने पाहतात. त्यामुळे बायोडाटात ढीगभर डाटा देऊच नका. लांबलचक बायोडाटा पाहायला मुलाखतकर्त्यांना वेळच नसतो. त्यामुळे तुम्ही प्रतीक्षा यादीत फेकले जाऊ शकता. तुमचा बायोडाटा कमीत कमी; पण महत्त्वपूर्ण माहितीने युक्त असायला हवा.
स्वस्तुती टाळा
बायोडाटामध्ये स्वस्तुती टाळा. त्यामुळे मुलाखतकर्त्यांच्या मनात तुमची अहंमन्य अशी प्रतिमा निर्माण होऊ शकते. विशेषत: सीजनड् प्रोफेशन, ॲकम्प्लिश्ड अंडररायटर अथवा टेक इव्हॅन्गलिस्ट असे शब्द टाळा. ते स्वस्तुतिकारक समजले जातात. त्यामुळे तुमचा बायोडाटा मुलाखतकर्ते बाजूला ठेवण्याचीच शक्यता जास्त असते.