मुंबई : बँक ऑफ महाराष्ट्रमध्येनोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने ऑफिसर स्केल (स्केल II, III, IV, V आणि VI) च्या विविध पदांसाठी थेट भरती जारी केली आहे. बँकेने १० जुलै रोजी या रिक्त पदासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
इच्छुक आणि पात्र उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइट bankofmaharashtra.in वर जाऊन फॉर्म भरू शकतात. अर्ज भरण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२४ आहे, त्यानंतर अर्ज प्रक्रिया थांबवण्यात येईल. अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी रिक्त जागेशी संबंधित संपूर्ण तपशील काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे आहे.
या भरती प्रक्रियेतून १९५ पदे ही भरली जातील. इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स आणि ट्रेझरी, आयटी, डिजिटल बँकिंग, सीआयएसओ, सीडीओ विभागांसाठी भरती सुरू आहे. या विभागांमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, सीनियर मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर आणि इतर पदांसाठी रिक्त जागा आहेत.
भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार असणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी पदानुसार पदवी/मास्टर्स/पोस्ट ग्रॅज्युएशन/बी टेक/बीई इ. पदवी असणे आवश्यक आहे. याशिवाय पदानुसार कामाचा अनुभवही मागवण्यात आला आहे. उमेदवार त्याचे तपशील अधिसूचनेत तपशीलवार पाहू शकतात.
या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल. यासाठी उमेदवारांना प्रथम अधिकृत अधिसूचनेची PDF डाउनलोड करावी लागेल. अर्जाचा नमुना यामध्येच उपलब्ध आहे. अर्ज भरल्यानंतर, उमेदवारांना महत्त्वाची कागदपत्रे आणि अर्ज शुल्काचा डिमांड ड्राफ्ट जोडून स्पीड पोस्टद्वारे बँकेकडे पाठवावा लागेल.
महाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, ‘लोक मंगल’ 1501, शिवाजी नगर, पुणे या पत्त्यावर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना लेखी परीक्षा ही द्यावी लागेल आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल आणि मगच उमेदवाराची निवड ही केली जाईल. भरती किंवा अर्ज प्रक्रियेशी संबंधित इतर माहितीसाठी, उमेदवार बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.