कोणतीही वस्तू उत्पादित करणे सोपे असते, पण त्याची विक्री करणे खूप कठीण. त्यामुळे जाहिरातीचा फंडा निर्माण झाला. जाहिरात जितकी आकर्षक तितकाच उत्पादनाचा खप अधिक, असे समीकरणच सध्या निर्माण झाले आहे. जाहिरातीत आकर्षकता येते पॅकेजिंगने. वस्तूचे पॅकेज जितके आकर्षक असेल तितकेच त्याचे विक्रीमूल्य वाढू शकते. उत्पादन योग्य आणि आकर्षक पॅकेजिंगच्या साहाय्याने ग्राहकांपुढे सादर केल्यास त्याला विशेष मूल्य प्राप्त होते. पॅकेजिंग ही जशी कला आहे, तसेच ते विज्ञानही आहे. या क्षेत्राचे महत्त्व पुष्कळ आहे आणि यात करिअरलाही चांगली संधी आहे.भारतासारख्या विकसनशील देशात अद्यापही पॅकेजिंग वापराचे दरडोई प्रमाण खूप कमी आहे. ते प्रतिव्यक्ती ४.५ किलोच्या आसपास आहे. हेच प्रमाण जर्मनीत ४४ किलो, तर चीनमध्ये २१ किलो इतके आहे. वेष्टनबद्ध न करता मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री केली जाते. पण अलीकडच्या काळात यात प्रगती होत आहे. भारतात जवळपास ३१ हजार पॅकेजिंग कंपन्या आहेत. यापैकी ८५ टक्के व्यवसाय हा लघू आणि मध्यम स्वरूपाचा आहे. हस्तकलेच्या बाबतीत आपण संपन्न आहोत; पण ते आकर्षकरीत्या वेष्टनबद्ध करून त्याचे मूल्य वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे औषधे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनाही पॅकेजिंगची गरज मोठ्या प्रमाणावर भासते. आता तर आकर्षक पॅकेजिंगप्रमाणेच त्यावर परिपूर्ण माहिती छापावी लागते. त्यानंतर त्या वस्तू ठराविक कालावधीत ग्राहकांपर्यंत पोहोचवायच्या असतात. अशावेळी तंत्रज्ञानाची त्याला जोड द्यावी लागते. विविध प्रकारच्या उत्पादनांचा वापर ज्या पद्धतीने केला जातो, त्यामध्ये विज्ञानाची जोड घेऊन कल्पकतेने बदल करण्याची संधी तरुणांना आहे.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पॅकेजिंग ही संस्था विविध अभ्यासक्रम आखत असते. यात लघू आणि दीर्घ मुदतीचे अभ्यासक्रम आहेत. त्यातील एक आहे सर्टिफिकेट प्रोग्रॅम इन ‘पॅकेजिंग टेक्नॉलॉजी’.पॅकेजिंग टेक्नॉलॉजीसर्टिफिकेट प्रोग्रॅम इन पॅकेजिंग टेक्नॉलॉजी हा तीन महिन्यांचा कोर्स आहे. यात पॅकेजिंगची मूलभूत तत्त्वे, पॅकेजिंगची प्रक्रिया आणि कार्यप्रणाली यांचा अंतर्भाव असतो.तर पोस्ट ग्रॅज्यूएट डिप्लोमा इन पॅकेजिंग हा दोन वर्षे मुदतीचा कोर्स आहे. यात पॅकेजिंग परीक्षण आणि मूल्यमापन, निर्मिती, विक्री आणि विपणन, डिझायनिंग आदींचा अंतर्भाव आहे. पण यासाठी प्रवेशपरीक्षा द्यावी लागते.यात अभियांत्रिकी, तंत्रज्ञान आणि विज्ञान विषयांतील पदवीधर पात्र समजला जातो. पॅकेजिंग विषयातील पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्याला पॅकेजिंगशी संबंधित प्रिंटिंग, लेबलिंग, पॅकेजिंग, लॉजिस्टीक या विषयांचेही ज्ञान मिळते. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ पॅकेजिंग दरवर्षी इंडिया स्टार अवॉर्डचे आयोजन करत असते. त्यात भारतातील उत्कृष्ट पॅकेजिंगची निवड करून त्याचा सन्मान केला जातो. विविध पुरस्कार मिळतात.
करिअर करा ‘पॅकेजिंग’च्या दुनियेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 1:16 AM