नवी दिल्ली : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनच्याविद्यापीठांमध्ये शिकत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना आता पुन्हा परतता येणार नाही. चीनमधील भारतील दूतावासाकडून जारी करण्यात आलेल्या एका निवेदनात यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर चीनमधील निर्बंध आणखीन कठोर करण्यात आले असून, भारतातून चीनमध्ये जाण्यासाठी कोणत्याही चार्टर्ड विमानाला परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यामुळे चीनमध्ये परतून शिक्षण पूर्ण करण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल, असे सांगितले जात आहे.
कोरोनाचे संकट चीनमध्ये गहिरे होत चालले आहे. सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकत नाहीत, हे दुर्दैवी आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून, दुसऱ्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवरील निर्बंध चीनने पुन्हा एकदा कठोर केले आहेत. चीनकडून नवीन नियमावली जारी करण्यात आली असून, ०२ नोव्हेंबर २०२० पूर्वी भारतीय नागरिकांना देण्यात आलेले व्हिजा रोखून धरण्यात आले आहेत, असेही भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले आहे.
भारतीय विद्यार्थ्यांनी दूतावासाचे संकेतस्थळ, सोशल मीडिया चॅनेल्सवर लक्ष ठेवू अपडेटेड राहावे, असे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, पुढील काही महिने तरी हे निर्बंध शिथील होण्याची शक्यता नाही. येथील विद्यार्थ्यांनाही पुढील सत्राचा अभ्यास ऑनलाइन माध्यमातूनच करायचा आहे.