रिअल इस्टेट क्षेत्रातील अग्रगण्य सल्लागार कंपनी म्हणून ओळख असलेल्या कॉलियर्स (Colliers) कंपनीनं आता भारतातील व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीनं यासंदर्भात आक्रमक रणनिती तयार करुन लवकरच १ हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलियर्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) रमेश नायर यांनी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या नव्या भरतीबाबत माहिती दिली आहे. कंपनी येत्या वर्षात १ हजार जागांसाठी भरती प्रक्रिया राबवणार असून जानेवारीतच कंपनीच्या दोन नव्या सेवा सुरू होणार आहेत. भारतीय बाजारात विस्तार करण्यासाठी कंपनीच्या आक्रमक रणनितीचाच हा एक भाग आहे, असं रमेश नायर यांनी म्हटलं आहे.
देशातील तीन अग्रगण्य रिअर इस्टेट सल्लागार कंपन्यांमध्ये आपल्या कंपनीचं स्थान निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवून कंपनी विस्तार करत असल्याचंही ते म्हणाले. नायर यांनी जुलै महिन्यातच कंपनीच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.
कंपनीची कार्यसंस्कृती, ब्रँड मार्केटिंग, अत्याधुनिक तंत्र आणि ग्राहक संख्या वाढविण्यासाठी अधिक कर्माऱ्यांची गरज कंपनीला भारणार आहे. आम्ही मजबूतीनं उभे आहोत आणि कंपनीला आणखी भक्कम करण्यसाठीच्या उपाययोजना राबवल्या जात आहेत, असं नायर म्हणाले. कंपनीची कार्यालयं, औद्योगिक आणि भांडारगृह तसंच वित्तीय व्यवस्था वाढविण्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज असल्यांचंही ते म्हणाले.
सर्व पदांवर नव्या कर्मचाऱ्यांची होणार नियुक्तीकॉलियर्स इंडियामध्ये सध्या जवळपास ३ हजार कर्मचारी काम करत आहेत. यात आणखी १ हजार कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. कंपनीत पुढील वर्षी दाखल होणारे १ हजार कर्मचारी हे पूर्णपणे नव्या पदांसाठी भरती केले जाणार असल्याचंही नायर यांनी स्पष्ट केलं आहे. कंपनी २०२२ साली भारतात दोन नव्या सेवा सुरू करणार असल्याचं देखील सांगितलं असलं तरी त्याबाबत अधिक माहिती देणं त्यांनी टाळलं आहे.
कोरोनावर मात करुन नव्यानं उभं राहतंय रिअर इस्टेट क्षेत्रकोरोना महामारीमुळे रिअर इस्टेट क्षेत्रात खूप मोठा फटका बसला. त्यावर आता मात करुन कंपनीनं पुन्हा रुळावर येत असल्याचंही नायर म्हणाले. निवासी क्षेत्रांसह कार्यालयं आणि शॉपिंग मॉल्स क्षेत्रातही आता चांगल्या सुधारणेचे संकेत दिसत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं आहे.