मुंबई - देशातील विमान क्षेत्रात होत असलेल्या वृद्धीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे विमान कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणावर कर्मचारी भरती होत असताना आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयामध्ये (डीजीसीए) देखील भरतीचे वारे वाहू लागले आहेत.
विमान वाहतूक व्यवस्थापन विभागात कर्मचारी भरती करण्यात येणार असून या कर्मचाऱ्यांना महिन्याकाठी तब्बल ७ लाख ४६ हजार रुपये वेतन मिळणार आहे. प्राप्त माहितीनुसार, नागरी विमान मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, डीजीसीएमध्ये एकूण १७ पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून त्याच्या सेवेचा कालावधी एक वर्षाचा असेल.
यामध्ये वरिष्ठ विमान वाहतूक निरीक्षकाच्या दोन जागा, विमान वाहतूक निरीक्षकाच्या १० तर हेलिकॉप्टर वाहतूक निरीक्षकाच्या ५ जागांचा समावेश आहे. पदवी, पदव्युत्तर शिक्षण अशी अर्हता निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ६४ पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.