नवी दिल्ली - इंटरनेटवरील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलकडून भारतात नवे कार्यालय उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. हे कार्यालय महाराष्ट्रातील पुणे येथे सुरू होणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात हे ऑफिस सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी गुगलकडून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही भरती गुरुग्राम, हैदराबाद, बंगळुरूमध्ये करण्यात येत आहे.
भारतामध्ये गुगल क्लाऊड इंजिनियरिंगचे व्हाईस प्रेसिडेंट अनिल भंसाली यांनी सांगितले की, भारत टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशचे केंद्र राहिले आहे. गुगल क्लाऊडसाठी आवश्यक टॅलेंट पूल भारतामध्ये उपस्थित आहे. त्यामुळे भारत गुगलसाठी सर्वात चांगले लोकेशन आहे. भंसाली यांनी सांगितले की, गेल्या १२ महिन्यांमध्ये कंपनीने भारतातील टॉप इंजिनियरिंग टॅलेंटला भारतामध्ये तयार होणाऱ्या डेव्हलपमेंट सेंटरसाठी हायर केले आहे. ते आमच्या ग्लोबल इंजिनियरिंग टीमसोबत मिळून अॅडव्हान्स क्लाऊड्स टेक्नॉलॉजीचा विकास करतील.
भंसाली यांनी सांगितले की, एक आयटी हब म्हणून पुण्यामध्ये आमचा विस्तार आम्हाला उत्तम प्रतिभावंतांसोबत काम करण्याची संधी देईल. वाढत्या ग्राहकांसाठी अद्ययावत क्लाऊड कम्प्युटिंग समाधान, उत्पादन आणि सेवा देण्यासाठीच गुगलकडून हे ऑफिस सुरू केलं जात आहे. गुगल क्लाऊडच्या जागतिक इंजिनियरिंग टीमच्या मदतीने पुण्याचे ऑफिस अद्ययावत इंटरप्राइज क्लाऊडच्या जागतिक इंजिनियरिंग टीमच्या मदतीने पुण्यातील ऑफिस अद्ययावत एंटरप्राइज क्लाऊड तंत्राची निर्मिती, रियल टाइम तांत्रिक सल्ला आणि उत्पादन आणि कार्यान्वयन तज्ज्ञता प्रदान करेल.