नवी दिल्ली: अलीकडेच केंद्रातील मोदी सरकारने पुढील जवळपास १८ महिन्यात १० लाख पदे भरणार असल्याची घोषणा केली आहे. पदवीधर असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने विभागातील विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात केली असून, निवडलेल्या उमेदवारांना ६० हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकेल, असे सांगितले जात आहे.
गृह मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार असून यासाठी ग्रॅज्युएट उमेदवार अर्ज करु शकणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. २४ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
गृह मंत्रालयाअंतर्गत कायदा अधिकारी ग्रेड I (सल्लागार) (उपसचिव/संचालक) ची २ पदे, कायदा अधिकारी ग्रेड II (सल्लागार) ची २ पदे, प्रशासकीय अधिकारीचे १ पद, मुख्य पर्यवेक्षक/सल्लागारची ३ पदे, पर्यवेक्षक/सल्लागारची ३ पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
लीगल ऑफिसर ग्रेड १ या पदासाठी आवश्यक कागदपत्रे
लीगल ऑफिसर ग्रेड १ या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा शिक्षणसंस्थेतून लॉची पदवी (५ वर्ष प्रॅक्टीससह) पूर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. उमेदवाराला कॉम्प्युटरची माहिती असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
लीगल ऑफिसर ग्रेड २ या पदासाठी आवश्यक कागदपत्रे
लीगल ऑफिसर ग्रेड २ या पदासाठी शासकीय पदावरून निवृत्त झालेले उमेदवारा अर्ज करु शकतात. त्यांच्याकडे प्रशासन आणि लेखाविषयक बाबींचा अनुभव असणे गरजेचे आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे. प्रशासकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ४५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.
मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार पदासाठी अर्ज करताय?
मुख्य पर्यवेक्षक/सल्लागार पदासाठी उमेदवाराकडे संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ६० हजार रुपये पगार दिला जाणार आहे. पर्यवेक्षक/सल्लागार या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी एमबीए किंवा बीबीए पूर्ण केलेले असावे. या पदासाठी निवड झालेल्या उमदेवारांना दरमहा ४० हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल.
सर्वेक्षक या पदासाठी काय करावे?
सर्वेक्षक या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार बारावी सायन्समधून ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. या पदासाठी निवड झालेल्या उमदेवारांना दरमहा २५ हजार रुपयांपर्यंत पगार मिळेल. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.