वेस्ट इंडिजविरूद्धची ट्वेंटी-२० मालिका भारतीय संघाने गमावली अन् कर्णधार हार्दिक पांड्या टीकाकारांच्या निशाण्यावर आला. हार्दिकने रविवारी झालेल्या निर्णायक सामन्यात केलेलं नवं धाडस अनेकांना खटकलं. पण, आपण आगामी काळातील कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी नवा प्रयोग केला असल्याचे हार्दिकने नमूद केले. हार्दिकच्या नेतृत्वात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत. वेस्ट इंडिजविरूद्धच्या तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात तिलक वर्माला अर्धशतकासाठी एक धाव हवी असताना भारतीय कर्णधार पांड्याने धोनी स्टाइलमध्ये षटकार ठोकून सामना संपवला. यानंतर एक 'घमंडी' कर्णधार म्हणून हार्दिकला संबोधले गेले. पण, पांड्याने टीकाकारांकडे दुर्लक्ष करत आपली रणनीती कायम ठेवली.
वन डे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघातील वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मागील मोठ्या कालावधीपासून भारताच्या ट्वेंटी-२० संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत अपराजित राहणाऱ्या टीम इंडियाला मात्र विडिंजने पराभवाची धूळ चारली. हार्दिकने गोलंदाजीत केलेले बदल, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांना कमी मिळालेली संधी यांमुळे पांड्या चर्चेत आहे. मात्र, मालिका गमावल्यानंतर हार्दिकने विविध बाबींवर प्रकाश टाकताना भविष्यातील अडचणींचा सामना करण्यासाठी नवं धाडस केल्याचे सांगितले.
दरम्यान, आयपीएलमध्ये पदार्पणाच्या हंगामातच गुजरात टायटन्सने हार्दिकच्या नेतृत्वात किताब पटकावला. दुसऱ्या हंगामात अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. साहजिकच तेव्हापासून हार्दिकचा आत्मविश्वास वाढला आहे. मात्र, इतरांना विचारात न घेता नवीन प्रयोग करण्याची हार्दिकची शैली अनेकांना खटकणारी आहे. अनेकदा त्याने याबद्दल टिप्पणी देखील केली. पण निर्णायक सामन्यात हार्दिकचा हा प्रयोग आपल्याच संघाच्या आंगलट आल्याचे दिसले. त्यामुळे विडिंजविरूद्धच्या दारूण पराभवाचे खापर पांड्यावर फोडलं जात आहे.
हार्दिकचं नवं 'धाडस' अन् चाहत्यांचा संताप संघाचा एखादा प्रमुख गोलंदाज असावा तसा कर्णधार पांड्याने गोलंदाजीचा मोर्चा सांभाळला होता. फायनल सामन्यात १६५ धावांचा बचाव करताना टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने गोलंदाजीचा श्रीगणेशा केला. त्याने आपल्या तीन षटकांत ३२ धावा दिल्या पण बळी घेण्यात पांड्याला यश आलं नाही. मुकेश कुमारचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून केलेला वापर आणि अक्षर पटेलला एकच षटक टाकण्याची मिळालेली संधी पांड्याच्या टीकाकारांना आमंत्रण देत आहे. खरं तर तब्बल सहा वर्षानंतर प्रथमच भारताने वेस्ट इंडिजविरूद्ध ट्वेंटी-२० मालिका गमावली आहे.
सामन्यानंतर बोलताना मात्र हार्दिक पांड्याने मी आपल्या रणनीतीवर ठाम असल्याचे दाखवून दिले. "आम्हाला चांगल्या पद्धतीने सामना संपवता आला नाही. पण, यातून खूप काही शिकण्यासारखे आहे. पराभव कधी कधी चांगला देखील असतो कारण तो आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवत असतो. हार जीत हा खेळाचा भाग आहे असं मी समजतो. गोलंदाजीत बदल केले यासाठी मी कोणतीही रणनीती आखली नव्हती. आम्ही एक संघ म्हणून जे कठीण आहे ते करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे प्रथम फलंदाजी केल्याबद्दल मला पश्चात्ताप होत नाही. अशा खेळांमुळे आम्हाला चांगले होण्यासाठी शिकायला मिळेल", असे हार्दिकने स्पष्ट केले. एकूणच हार्दिकने धाडसी निर्णयांचा दाखला देऊन पराभवातून खूप काही शिकता आले असल्याचे नमूद केले. २०२४ हे वर्ष ट्वेंटी-२० विश्वचषकाचे असणार आहे. यासाठी देखील हा नवा प्रयोग फायदेशीर असल्याचे पांड्याने सांगितले.
पांड्या टीकाकारांच्या निशाण्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील हार्दिकच्या या व्यवहारावर सडकून टीका होत आहे. नवीन प्रयोग निर्णायक सामन्यात का केला जातो, असा सूर क्रिकेट वर्तुळातून उमटत आहे. चाहत्यांसह काही माजी क्रिकेपटूंपासून प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने देखील समालोचन करताना पांड्याच्या या रणनीतीवर प्रश्न उपस्थित केले. हार्दिक पांड्याची रणनीती चुकली असून तो हताश झाला असल्याची टीका चोप्राने केली. तसेच मुकेश कुमारला लवकर षटक का दिले जात नाही? हा मोठा प्रश्न असल्याचे त्याने म्हटले. याशिवाय मुकेश कुमार कसोटी क्रिकेटमध्ये नव्या चेंडूने गोलंदाजी करतो मात्र इथे तसे होत नाही. ट्वेंटी-२० मध्ये मुकेशला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणूनच का वापरले जाते, असेही आकाश चोप्राने नमूद केले. एकूणच हार्दिकचा हा अति आत्मविश्वास भविष्यात भारतीय संघाला तारतो की पुन्हा तेच 'पावने पाच' अशी मालिका होते हे पाहण्याजोगे असेल. पण, आताच्या घडीला तरी पांड्याचं हे वागणं बरं नव्हं... असं म्हणता येईल.