नवी दिल्ली : भारतीय लष्कराने अग्निवीर भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. 2024-25 च्या अग्निवीर भरतीमध्ये हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. लष्कराने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे. यासोबतच सर्व राज्यांच्या सैन्य भरती मंडळांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. नवा नियम अग्निवीर अंतर्गत क्लर्क आणि स्टोअरकीपर या पदांच्या भरतीसाठीच लागू असणार आहे. तसेच, हा नवीन नियम इतर पदांना लागू होणार नाही.
आता क्लर्क आणि स्टोअरकीपर पदांच्या भरतीसाठी लष्कर टायपिंग टेस्ट देखील घेईल, जी हिंदीमध्ये प्रति मिनिट 30 शब्द आणि इंग्रजीमध्ये 35 शब्द प्रति मिनिट असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिहार-झारखंड सैन्य भरती मंडळ डायरेक्टोरेटच्या एका अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आणि सांगितले की, अग्निवीर अंतर्गत क्लर्क आणि स्टोअरकीपर पदांच्या भरतीसाठी टायपिंग टेस्ट होईल, परंतु त्याचे मानक अद्याप ठरलेले नाही. मानक लवकरच निश्चित केले जाईल.
कोण करू शकतो अर्ज?क्लर्क आणि स्टोअरकीपरच्या पदांसाठी 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. गेल्या वर्षी लष्कराने भरती प्रक्रियेत आणखी एक बदल केला होता. त्याअंतर्गत आता प्रथम लेखी परीक्षा होईल आणि त्यानंतर भरती मेळावा आयोजित केला जाईल. यापूर्वी लेखी परीक्षा नंतर आयोजित करण्यात आली होती आणि त्यापूर्वी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. भरती मेळाव्यातील गर्दी कमी करण्यासाठी लष्कराने हा बदल केला होता.
'या' पदांसाठी भरती भारतीय हवाई दलाद्वारे अग्निवीरच्या 3500 पदांसाठी अर्ज प्रक्रिया 17 जानेवारी 2024 पासून सुरू होणार असून 6 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, उमेदवार विहित अंतिम तारखेला किंवा त्यापूर्वी अर्ज सादर करू शकतात. निवड लेखी परीक्षा पीईटी आणि कागदपत्र पडताळणीद्वारे केली जाईल.