भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी आता दरवर्षी एकदाच संधी मिळणार आहे. याचबरोबर शारीरिक चाचणीबरोबर मैदानी आणि मेडिकल चाचणीचेही नियम बदलणार आहेत. यामुळे जर तुम्ही सैन्यात भरती होण्याची तयार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.
आता उमेदवार वर्षातून एकदाच भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकणार आहेत. याचबरोबर मैदानी चाचणीपूर्वी कॉमन एन्ट्रन्स एक्झाम होणार आहे. यात पास झालेल्या उमेदवारांनाच मैदानी आणि मेडिकल एक्झामला घेतले जाणार आहे.
राजस्थानचे उपमहासंचालक (भरती) ब्रिगेडियर जगदीप चौहान यांनी सांगितले की, या वर्षापासून उमेदवार वर्षातून एकदाच सैन्य भरती मेळाव्यासाठी अर्ज करू शकतात. शारीरिक चाचणीपूर्वी सीईटी घेतली जाणार आहे. चौहान यांच्या हवाल्याने पीटीआयने ही बातमी दिली आहे. आतापर्यंत मैदानी चाचणी आधी आणि नंतर उमेदवारांची परीक्षा घेतली जात होती.
अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे १६ फेब्रुवारी ते १५ मार्च एवढीच मुदत असणार आहे. नवीन भरती प्रक्रियेमध्ये पहिल्या टप्प्यात भरती अधिसूचना, ऑनलाइन नोंदणी, प्रवेशपत्र, ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा, निकाल आणि कॉल-अप यांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात प्रवेशपत्र, बायोमेट्रिक पडताळणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, शारीरिक मोजमाप चाचणी, वैद्यकीय परीक्षा आणि त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जारी केली जाणार आहे.