नवी दिल्ली: अलीकडेच खासगी असो वा सरकारी अनेकविध विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोरोना संकटात लाखों नोकऱ्या गेल्या होत्या. आता मात्र, या नानाविध भरती प्रक्रियांमुळे बेरोजगारांना दिलासा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. केवळ दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आहे. भारतीय रेल्वेत आता तब्बल ५,६३६ जागांसाठी बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नॉर्दन फ्रंटियर रेल्वेमध्ये (Northeast Frontier Railway Recruitment Cell NFR – RRC) काम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. तसेच या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एकूण ५,६३६ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोणत्या पदांसाठी केली जातेय भरती?
भारतीय रेल्वेच्या नॉर्दन फ्रंटियर विभागात अप्रेंटिस पदाची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, सुतार, डिझेल मेकॅनिक, मशिनिस्ट, पेंटर, टर्नर, रेफ्रिजरेटर आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेसन, प्लंबर, लाइनमन, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स सिस्टिम ही पदे भरली जाणार आहेत. यासाठीच्या ५,६३६ रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
कोणती कागदपत्रे लागणार?
या विविध पदांसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असून एससी/एसटी/पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांकडून शुल्क घेण्यात येणार नाही. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.
पदांसाठी शैक्षणिक पात्रता काय?
या पदासाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून किमान ५० टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नॅशनल काऊन्सिलने जाहीर केलेल्या नोटिफिकेशननुसार, ट्रेडमध्ये आयटीआय असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांकडे नॅशनल काऊन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग/स्टेट कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग द्वारे देण्यात आलेले व्यावसायिक प्रशिक्षण किंवा तात्पुरते प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कामाचा किमान अनुभव असावा. तसेच उमेदवारांना संस्थेने जाहीर केलेलल्या सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. उमेदवारांना दिलेल्या लिंकवर जाऊन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. ३० जून २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, असे सांगितले जात आहे.