नवी दिल्ली: अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सरकारी कार्यालयात तब्बल १० लाख पदांची भरती करण्याचे निर्देश दिले. यानंतर अनेकविध सरकारी विभाग कामाला लागले असून, पुढील १८ महिन्यात बंपर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेने आगामी वर्षभरात तब्बल दीड लाखाच्या घरात रिक्त पदे भरणार असल्याचे जाहीर केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांत रेल्वेने दरवर्षी सरासरी ४३ हजार ६७८ लोकांना नोकऱ्या दिल्या आहेत. वेतन आणि भत्तेवरील खर्च विभागाच्या वार्षिक अहवालानुसार, १ मार्च २०२० पर्यंत, केंद्रीय कर्मचाऱ्यांची संख्या ३१ लाख ९१ हजार इतकी होती. या आकडेवारीत केंद्रशासित प्रदेशांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. तर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील सर्व विभागांमध्ये ४०.७८ लाख पदे मंजूर करण्यात आली आहेत.
नोकरी देण्याच्या हालचालींना वेग
पंतप्रधान कार्यालयाकडून विविध विभाग आणि ९१ मंत्रालयांना रिक्त पदांची यादी तयार करण्यास सांगितल्याची माहिती सरकारशी संबंधित सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच १० लाख लोकांना नोकऱ्या देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीदरम्यान विविध विरोधी पक्षांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावरून भाजपला घेरले होते. या पार्श्वभूमीवर नोकरी देण्याच्या हालचालींना वेग आल्याचे म्हटले जात आहे. केंद्र सरकारमधील विविध विभागांमध्ये साधारण २१.७५ टक्के पदे रिक्त आहेत. या कर्मचाऱ्यांचे ९२ टक्के मनुष्यबळ हे पाच मुख्य मंत्रालये किंवा विभागांचे आहे, ज्यात रेल्वे, संरक्षण (नागरी), गृह, महसूल या विभागांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांव्यतिरिक्त, ३१.३३ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांपैकी ४०.५५ टक्के रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.
दरम्यान, रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार २०१४-१५ ते २०२१-२२ पर्यंत एकूण ३ लाख ४९ हजार ४२२ नोकऱ्या देण्यात आल्या. वर्षनिहाय सरासरी पाहिल्यास दरवर्षी ४३,६७८ लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तर २०२२-२३ मध्ये १ लाख ४८ हजार ४६३ नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.