जर तुम्हाला एखादे क्षेत्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं असेल तर तिथं इंटर्नशिप करा, असं तुम्ही कॉलेजच्या काळात अनेकांकडून ऐकलं असेल. कदाचित तुम्हीही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात इंटर्नशीप केली असेल किंवा काहीजण आता इंटर्नशीप करण्याचा विचारही करत असतील. पण इंटर्नशिप दरम्यान चांगला स्टायपेंड मिळतोच असं नाही. कारण बहुतांश इंटर्नशिप मोफत कराव्या लागतात. अनेक महिने इंटर्नशिप केल्यानंतर कुठेतरी नोकरी पक्की होते. तर काही कंपन्या त्यांच्या इंटर्नला स्टायपेंड देखील देतात. मात्र उमेदवाराचा प्रवासाचा खर्च निघू शकेल इतकेच पैसे स्टायपेंड म्हणून दिले जातात.
एक इंटर्नशिप अशी देखील आहे, जिथं मोठ्या कंपन्यांमध्ये मिळणाऱ्या पगाराला स्पर्धा दिली आहे. ही इंटर्नशिप केरळमधील कोची शहरात स्थित 'कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी' (CUSAT) च्या विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या वर्षी CUSAT अंतिम वर्षाच्या ६४० विद्यार्थ्यांना हाय-प्रोफाइल कंपन्यांमध्ये संधी मिळाली आहे. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लाखो रुपये पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. मात्र सर्वाधिक चर्चेचा विषय येथील विद्यार्थ्यांना मिळालेल्या सुमारे एक लाख रुपयांच्या इंटर्नशिपचा आहे.
इंटर्नशिपसाठी महिन्याला ९८ हजार रुपयांचं मानधनमीडिया रिपोर्ट्सनुसार, CUSAT च्या प्लेसमेंट ऑफिसरने सांगितलं की कॉलेजचे ९ विद्यार्थी असे आहेत ज्यांना दरमहा ९८,००० रुपयांच्या स्टायपेंडसह इंटर्नशिप मिळाली आहे. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सहसा कोणत्याही उमेदवाराला इतका पगार देखील मिळत नाही. मोठमोठ्या कंपन्या फ्रेशरला कामावर घेतल्यावर इतका पगार देतही असतील. पण इंटर्नशिपसाठी इतके पैसे मिळणं क्वचितच पाहायला मिळतं.
साधारणपणे इंटर्नशिप दरम्यान मिळणारा पगार काही हजारांपर्यंत मर्यादित असतो. पण या इंटर्नशिपमध्ये मिळणाऱ्या पगारातून असे म्हणता येईल की एवढे पैसे मिळाले तर नोकरीची गरजच काय?. विशेष म्हणजे कॉलेज किंवा विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप खूप महत्त्वाची असते. याद्वारे नोकरी मिळण्यापूर्वी एखादे क्षेत्र समजून घेण्याची संधी मिळते.
प्लेसमेंट अधिकाऱ्याने सांगितले की, यावर्षी सर्वाधिक पॅकेज २५ लाख रुपये वार्षिक इतकं आहे. सरासरी, प्रत्येक विद्यार्थ्याला वार्षिक ४.९ लाख रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. TCS, Infosys, Wipro, IBM, Amazon या १५० हून अधिक कंपन्यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या दिल्या आहेत. असे ९ विद्यार्थी आहेत, ज्यांना २५ लाखांचं पॅकेज मिळालं आहे.