नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) मध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 14 जुलै ही अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाअंतर्गत (AAI Recruitment 2022) ज्युनिअर एक्झिक्युटिव्हच्या रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण 400 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून फिजिक्स आणि मॅथसह बीएससी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला इंग्रजी भाषा लिहीता आणि बोलता येणं गरजेचे आहे. या पदासाठी 27 वर्षांपर्यंत उमेदवार अर्ज करू शकतात.
ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 40 हजार ते एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत पगार दिला जाणार आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी ओळखपत्रासह महत्त्वाची कागदपत्रं देणं गरजेचं आहे. या पदांसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेले उमेदवार एएआयच्या अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.