सध्या जगभर भारतातील नृत्य, संगीत यांच्याविषयीचे आकर्षण वाढत आहे. भारतीय पारंपरिक नृत्यकला सादरीकरणाला जगभरातून मोठी मागणी आहे. ज्यांना इंजिनीअरिंग, मेडिकल, सीए यापेक्षाही आव्हान असलेले करिअर करायचे आहे, अशांना या क्षेत्रात भरपूर संधी उपलब्ध आहेत. पाश्चात्य नृत्य प्रकारांना, संगीताला ज्याप्रमाणे पूर्वी मागणी होती, तशीच मागणी कथ्थक, भरतनाट्यम या परंपरागत भारतीय नृत्य प्रकारांना सध्या आहे. या क्षेत्रात प्रसिद्धी मिळविण्यासाठी करावे लागणारे अपार कष्ट विचारात घेतले पाहिजेत.
या क्षेत्रात पूर्णपणे करिअर करायचे असेल तर शाळा, महाविद्यालयांमध्ये संगीत, नृत्य शिक्षक म्हणूनही नोकरीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याचबरोबर नृत्य, संगीत यांचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक संस्थांमध्ये कलाकारांना प्रशिक्षण देण्याचे काम मिळू शकते. नृत्य, संगीत प्रशिक्षणाच्या खासगी संस्थांमध्ये शिक्षण देण्याचे काम पार्टटाइमही केले जाऊ शकते. नोकऱ्या सांभाळून नृत्य, संगीत, गाण्याचे कार्यक्रम करणारे अनेक कलाकार आहेत.
ओडिसी, कुचीपुडी, कथ्थक, भरतनाट्यम, लोकनृत्य या परंपरागत नृत्य प्रकारांबरोबरच आधुनिक नृत्य हा प्रकारही समाविष्ट झालेला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्य दिग्दर्शकांना (कोरिओग्राफर) सध्या मोठी मागणी आहे. नृत्यशिक्षक, नृत्य संयोजक, स्टेज सेटिंग संयोजक, रिहर्सल सुपरवायझर म्हणून तुम्ही करिअरची सुरुवात करू शकता. नृत्य कलेचे शिक्षण घेणाऱ्यांना अनेक नाट्यसंस्था, लोककला विषयक संस्था यामध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. स्वतःची नृत्य अकादमी सुुरू करू शकता.
नृत्यकलेबरोबरच अभिनय क्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. उमेदवारांनी दहावी अथवा बारावी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभिनय प्रशिक्षणाची पदवी मिळविता येते किंवा पदविकाही मिळविता येते.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला प्राधान्य
दिल्ली येथील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा ही संस्था जगभरात नावाजलेली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी या संस्थेत प्रशिक्षण घेतले आहे. शाळा किंवा महाविद्यालयाच्या स्तरावर नाटकांमध्ये भाग घेतला असेल तर अशा उमेदवारांना नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेशासाठी प्राधान्य दिले जाते. याचबरोबर अभिनय क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती पूर्वानुभवाच्या जोरावर अभिनय व त्याच्याशी संबंधित गोष्टींचे प्रशिक्षण देतात.