Konkan Railway Recruitment: गेल्या अनेक महिन्यांपासून खासगी तसेच सरकारी अनेक विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोरोनानंतर बहुतांश जग पूर्वपदावर आलेले असताना पुन्हा एकदा नवीन सुरुवात जोमाने व्हावी, यासाठी अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्या नोकरभरती करताना पाहायला मिळत आहे. यातच आता कोकण रेल्वेत (Konkan Railway Corporation Limited) पदभरती करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही भरती थेट मुलाखतीतून होणार असून, तब्बल १ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकणार आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) आणि डेप्युटी एफ ए अॅण्ड सीएओचे प्रत्येकी एक पद भरले जाणार आहे.
मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड
या पदांसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले असून मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत आणणे आवश्यक आहे. १७ ऑगस्ट ही अर्जाची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना स्वखर्चाने मुलाखतीला उपस्थित राहावे लागणार आहे. उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, असे सांगितले जात आहे.
१ लाख रुपयांपर्यंत मिळेल पगार
डेप्युटी जनरल मॅनेजर (फायनान्स) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून अकाऊंट अॅण्ड फायनान्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव असावा. निवड झालेल्या उमेदवाराला कॉर्पोरेट ऑफिस बेलापूर, नवी मुंबई येथे नोकरी करावी लागणार आहे. या पदासाठी ४५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा १ लाख ५ हजार ५९२ रुपये इतका पगार दिला जाणार आहे.
दरम्यान, डेप्युटी एफ ए अॅण्ड सीएओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून अकाऊंट अॅण्ड फायनान्सपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असावे. तसेच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान ७ वर्षांचा अनुभव असावा. या पदासाठी ४५ वर्षे इतकी वयोमर्यादा आहे. निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ७८ हजार ८०० रुपये इतका पगार दिला जाणार आहे. उमेदवारांची मुलाखत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., कॉर्पोरेट कार्यालय, भर्ती कक्ष, ६ वा मजला, प्लॉट क्र.६, सेक्टर-११, बेलापूर भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई, महाराष्ट्र (उप महाव्यवस्थापक) येथे होणार आहे.