मुंबई - महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळ सेवा भरती-२०२१ अंतर्गत आयोजित ऑनलाईन परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीकरिता संवर्गनिहाय सूची म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सदर जाहीर सूचीतील सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक व लघुटंकलेखक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक ०९ जून व १० जून, २०२२ या दोन दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे.
तसेच कागदपत्र पडताळणीच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी दिनांक १४ जून ते १७ जून, २०२२ या चार दिवसांच्या कालावधीत म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात केली जाणार आहे. कागदपत्र पडताळणीच्या सूचीमध्ये नाव असलेल्या सहायक विधी सल्लागार, मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी, सहायक वास्तुशास्त्रज्ञ, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, भूमापक, अनुरेखक, लघुटंकलेखक, सहायक, वरिष्ठ लिपीक, कनिष्ठ लिपीक या संवर्गातील यशस्वी उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी विहित केलेल्या दिवशी कक्ष क्रमांक २१५, पहिला मजला, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण, गृहनिर्माण भवन, वांद्रे पूर्व, मुंबई येथे उपस्थित राहावे, असे आवाहनही म्हाडा प्रशासनाने केले आहे.
वरील नमूद संवर्गातील सूचीमध्ये एकापेक्षा जास्त संवर्गाच्या सूचीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी एकाचवेळी कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत, असे आवाहन 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी केले आहे. सरळ सेवा भरतीतील यशस्वी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीसाठीचे संवर्गनिहाय वेळापत्रक म्हाडाच्या https://mhada.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले असून यशस्वी उमेदवारांनी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे