नवी दिल्ली – केंद्र सरकारने २०२४ पर्यंत पंतप्रधान जन औषधी केंद्राची संख्या १० हजारांपर्यंत वाढवण्याची योजना बनवली आहे. देशात १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत जन औषधी केंद्राची(Jan Aushadhi Kendra) संख्या ८ हजार ३६६ इतकी झाली आहे. देशातील ७३६ जिल्ह्यांमध्ये ही केंद्र उघडण्यात आली आहेत. या केंद्रामुळे सर्वसामान्यांचा औषधांवर होणाऱ्या खर्चाचा बोझा कमी करण्यास मदत झाली आहे. सरकार सहजपणे जेनरिक औषधं या केंद्रावर उपलब्ध करून देते. जर तुम्हालाही हा बिझनेस करायचा असेल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. यातून चांगली कमाईही करू शकता.
९० टक्के स्वस्त दरात मिळतात औषधं
रसायने आणि खते मंत्रालयाने सांगितले आहे की, सरकार मार्च २०२४ पर्यंत पंतप्रधान जन औषधी केंद्राची संख्या वाढवून १० हजारापर्यंत करण्याचं लक्ष्य आहे. या केंद्रावर १४५१ औषधं आणि २४० सर्जिकल उत्पादन मिळतात. पंतप्रधान जन औषधी योजनेतंर्गत उपलब्ध असणाऱ्या औषधांची किंमत ब्रँन्डेंड औषधांच्या तुलनेत ५० ते ९० टक्के स्वस्त दरात सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यात येतात. १० ऑक्टोबर २०२१ पर्यंत भारतात ४३१ कोटी औषधं विक्री या केंद्रातून झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांचे २५०० कोटी रुपये वाचले आहेत.
जन औषधी केंद्र उघडणार कसं?
सरकारकडून जन औषधी केंद्र उघडण्याची सुवर्णसंधी दिली जाते. सर्वसामान्य व्यक्ती ज्याला व्यवसाय करायचा आहे तो हे केंद्र उघडून चांगली कमाई करू शकतो. त्याचसोबत आरोग्य क्षेत्रात काम करण्याची संधी आहे. हे औषधी केंद्र जेनेरिक औषधांची विक्री करते. केंद्र उघडण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागतो. भारत सरकार जन औषधी योजनेतंर्गत अडीच लाख रुपयांची आर्थिक मदत करते. ज्यातून तुम्ही हे औषधी केंद्र उघडू शकता. परंतु सरकार २.५० लाख रुपये एकत्र देत नाहीत तर टप्प्याटप्प्यात ही रक्कम लाभार्थ्यांना देते. हा पैसा प्रत्येक महिन्याला इन्सेटिव्ह म्हणून दिला जातो.
कोण उघडू शकतो?
सरकार या योजनेतंर्गत जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी सर्वात पहिलं संबंधित व्यक्तीकडे डी फार्मा अथवा बी फार्मा पदवीधारक असणं गरजेचे आहे. जर तो जनऔषधी केंद्र खोलून कुणाला रोजगार देऊ इच्छितो तर त्याच्याकडेही ही डिग्री असणं आवश्यक आहे. अर्ज दाखल करताना तुम्हाला पदवी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. कुणीही व्यक्ती, हॉस्पिटल, फार्मासिस्ट, डॉक्टर, मेडिकल प्रॅक्टिशनर यासाठी अर्ज दाखल करू शकतात. PMJAY योजनेत SC, ST आणि दिव्यांग अर्जदारांना औषधी केंद्र सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये एडवान्स म्हणून दिले जातात. पंतप्रधान भारतीय जन औषधी केंद्र नावानं हे दुकानं उघडण्यात येईल.
कशी होणार कमाई?
जन औषधी केंद्र १२ महिन्याच्या विक्रीवर १० टक्के अतिरिक्त इन्सेटिव्ह देतं. ही रक्कम अधिकाधिक १० हजार रुपये प्रति महिना असते. उत्तर पूर्व राज्यात, नक्षलग्रस्त परिसरात तसेच आदिवासी भागात ही रक्कम १५ टक्क्यांपर्यंत दिली जाते. जर तुम्हाला या केंद्रासाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुमच्याकडे आधार, पॅनकार्ड असायला हवं. तसेच आवश्यक कागदपत्रांसह तुमच्याकडे १२० स्क्वेअर फूट जागा हवी.