प्रविण मरगळे
मुंबई – जिद्द आणि चिकाटी अंगात असली तर आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न पूर्ण करता येतं. सातारच्या बोरी गावातील मुलीने याच स्वप्नाचा पाठलाग करत आज राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या आहेत. पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल असणाऱ्या नानासाहेब धायगुडे यांची कन्या स्नेहलला मिळालेल्या यशाने अवघ्या बोरी गावात उत्साह पसरला आहे.
खंडाळा तालुक्यातील बोरी गावची मुलगी स्नेहल धायगुडे हिने वयाच्या २२ व्या वर्षी आयएएस परीक्षेत यश संपादन केले. २०१८ मध्ये स्नेहलचा देशात १०८ वा नंबर आला होता. त्यानंतर ट्रेनिंगनंतर अलीकडेच तिने राजस्थानच्या उदयपूर जिल्ह्यात परिविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार हाती घेतला आहे. एका लहानश्या कुटुंबात जन्मलेल्या या मुलीने साखरवाडी येथे मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर बारामतीतल्या शारदा आश्रम येथून माध्यमिक शिक्षण पूर्ण करुन पुण्यातील कृषी महाविद्यालयात बीएससी एग्रो ही पदवी मिळवली.
कॉलेज जीवनापासून स्नेहलने अपार मेहनत घेत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. २०१७ मध्ये अवघ्या २ महिन्याच्या कालावधीत तिने बेसिक तयारीच्या जोरावर यूपीएससी पूर्व परीक्षा दिली, दुर्दैवाने पहिल्या परीक्षेत तिला अपयश आलं. मात्र यातून मागे न हटता तिने आणखी अभ्यास केला. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तिने २०१८ मध्ये पुन्हा यूपीएससीची परीक्षा दिली. या परीक्षेत देशात १०८ वा रॅँक मिळवत ती वयाच्या २२ व्या वर्षी आयएएस झाली. राज्यातील सर्वात तरुण महिला अधिकारी होण्याचा मान मिळवला.
स्नेहलचे वडील सातारा पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे, गावाकडे शेती सांभाळत स्नेहलने शिक्षणाला सुरुवात केली. स्नेहलच्या या यशात सर्वाधिक वाटा आई-वडिलांचा असल्याचं ती सांगते. कारण मुलीने शिकलं पाहिजे यासाठी आई-वडिलांनी तिच्यासाठी मेहनत घेतली. तिच्या वयाच्या मुला-मुलींची लग्न झाली पण आपल्यावर कधीच घरच्यांनी दबाव टाकला नाही, आयुष्यात जे हवं ते करण्यासाठी पाठबळ दिलं. मुलीवरचा हाच विश्वास मी सार्थ केला असं स्नेहलने सांगितले.