नवी दिल्ली: कोरोना संकटातून देश सावरत असताना अनेकविध क्षेत्रात रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध होत आहेत. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांना रिझर्व्ह बँकेत (RBI Assistant Recruitment 2022) रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. असिस्टंटच्या जवळपास ९०० पेक्षा अधिक पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
रिझर्व्ह बँकेने १७ फेब्रुवारी २०२२ पासून असिस्टंटच्या ९५० पदांसाठी भरती सुरू केली असून, ०८ मार्च २०२२ रोजीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने इच्छुक उमेदवार आपला अर्ज करू शकतो. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार कोणत्याही शाखेचे पदवीधर असावेत. तसेच सदर अभ्यासक्रम ५० टक्क्यांनी अधिक गुणांनी उत्तीर्ण केलेला असावा. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १ फेब्रुवारी २०२२ रोजी २० ते २८ वर्षांदरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार, आरक्षित वर्गासाठीची सूट कायम असेल.
कधी आहे परीक्षा आणि पगार
RBI Assistant Recruitment 2022 या पदांसाठी २६ आणि २७ मार्च २०२२ रोजी परीक्षा घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बँकेने ठरवून दिलेले पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. या पदांसाठी निवडण्यात आलेल्यांना ३६ ते ४० हजारांपर्यंत पगार मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.