सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आहे. रेल्वे विभागाकडून आरपीएफ (रेल्वे पोलीस दल) कॉन्स्टेबल पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. तसेच, सब इन्स्पेक्टरची पदे देखील या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. नुकतीच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लगेच अर्ज करावा लागणार आहे.
रेल्वे विभागाकडून एकूण 2250 रिक्त पदांसाठी आरपीएफ भरती 2024 अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यापैकी 2000 कॉन्स्टेबल आणि 250 सब इन्स्पेक्टर अशी पदे आहेत. लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणी आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणीच्या आधारे उमेदवारांना या पदांसाठी निवडले जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की 10 टक्के आणि 15 टक्के जागा अनुक्रमे माजी सैनिक आणि महिलांसाठी राखीव आहेत.
आरपीएफ भरती अंतर्गत सब इन्स्पेक्टर पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 20 ते 25 वर्षे आहे. कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्षे आहे. आरक्षित श्रेणीतील उमेदवारांना रेल्वे भरती मंडळाच्या नियमांनुसार वयात काही सूट दिली जाईल. याचबरोबर, शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास सब इन्स्पेक्टर पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त मंडळ किंवा संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. तर कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त मंडळाकडून 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी रेल्वे भर्ती बोर्ड राष्ट्रीय स्तरावरआरपीएफ भरती परीक्षा आयोजित करत आहे. रेल्वे पोलीस दलात उपलब्ध असलेल्या पदासाठी पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. इच्छुक उमेदवार rpf.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतील. त्यामुळे रेल्वे विभागाकडून ही एक प्रकारची बंपर भरती प्रक्रियाच राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.