ST Recruitment: गेल्या अनेक महिन्यांपासून खासगी तसेच सरकारी अनेक विभागात मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया राबवली जात आहे. कोरोनानंतर बहुतांश जग पूर्वपदावर आलेले असताना पुन्हा एकदा नवीन सुरुवात जोमाने व्हावी, यासाठी अनेकविध क्षेत्रातील विविध कंपन्या नोकरभरती करताना पाहायला मिळत आहे. यातच आता राज्याची लालपरी म्हणजेच गावागावात सेवा देणाऱ्या एसटीतनोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे. ST महामंडळाच्या एका विभागात पदभरती करण्यात येत आहे.
दहावी उत्तीर्ण असलेल्या शिकाऊ उमेदवारांना एसटी महामंडळाअंतर्गत नोकरी करण्याची संधी आहे. यासाठी अर्ज करण्याचे काही दिवसच शिल्लक असून, उमेदवारांना कामाचा चांगला अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर येथे ही भरती केली जाणार असून यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून, पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
किती आणि कोणत्या पदांवर पदभरती होणार?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर अंतर्गत मॅकेनिकल मोटर व्हिकल, इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक व्हिकल बॉडी बिल्डर, मॅकेनिकल इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग या पदांवर शिकाऊ उमेदवारांच्या एकूण ५२ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून दहावी उत्तीर्ण उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी संबधित ट्रेडमध्ये आयटीआय पूर्ण केलेला असावा. उमेदवारांना संबंधित कामाचा किमान अनुभव असावा.
कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे. उमेदवारांनी आपले अर्ज रा.प. विभागीय कार्यालय, जुना रेणापूर नाका, अंबाजोगाई रोड, लातूर (आस्थपना शाखा ) –४१३५२७ या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
दरम्यान, या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ लातूर यांनी दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, असे सांगितले जात आहे.